बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर
By Admin | Updated: April 7, 2015 01:56 IST2015-04-07T01:56:34+5:302015-04-07T01:56:34+5:30
रिक्त पदांची घरघर; वैद्यकीय अधिका-यांची ८३ पदे रिक्त.

बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर
सिद्धार्थ आराख/बुलडाणा : कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांची घरघर लागल्याने आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे चित्र सर्वत्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह १२ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांची तब्बल ८५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधीनस्त वैद्यकीय अधिकारी गट-अ वर्ग-१ ची मंजूर ४९ पदां पैकी केवळ १३ पदे भरलेली असून, ३६ पदे रिक्त आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील १६, खामगाव उपजिल्हा रुग्णालयातील १0, सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथील १ आणि मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील १ असे २८ पदांचा समावेश आहे. तर बीबी, देऊळगावमही, चिखली, लाखनवाडा, वरवट बकाल, सिंदखेडराजा, मोताळा, धाड, मेहकर, लोणार, देऊळगावराजा आणि जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येकी १ अशा ८ वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त आहेत. याशिवाय जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रमीण व सामान्य रुग्णालयात गट-अ वर्ग-२ ची ११३ पदे मंजूर आहेत, पैकी ६८ पदे भरलेली असून, ४५ पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील ११ पदांचा समावेश असून, त्या पाठोपाठ खामगाव, शेगाव आणि मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी गट-ब वर्ग -३ ची जिल्ह्यात १0 पदे मंजूर आहेत यापैकी केवळ ६ पदे भरण्यात आली आहेत. यातील ४ पदे रिक्त आहेत. यामध्ये खामगाव, मलकापूर, मेहकर, शेगाव, देऊळगावराजा, येथील नगरपालिकेच्या रुग्णालया तील वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे तर, जिल्हा कारागृह आणि क्षय आरोग्य धाम येथील रुग्णालयातसुद्धा रिक्त पदांचा अनुशेष आहे. या रिक्त पदांमुळे रुग्णालयात सुविधा असताना त्यापासून रुग्णांना वंचित राहावे लागत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.