हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्याचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:31 IST2021-01-22T04:31:15+5:302021-01-22T04:31:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : रस्त्याच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून कल्याणा शिवारातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या ...

He stopped the road work with an ax in his hand | हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्याचे काम पाडले बंद

हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्याचे काम पाडले बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : रस्त्याच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून कल्याणा शिवारातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या धुळीला कंटाळून अखेर मेहकर तालुक्यातील कल्याणा शिवारातील संतप्त शेतकरी अनिरुद्ध तांगडे व इतरांनी हातात कुऱ्हाड घेत बुधवारी दुपारी रस्त्याचे काम बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांचा संताप पाहून रस्ता तयार करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे कामावरील वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील ३६ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे काम आपको कंपनीकडून सुरू आहे. या महामार्गाच्या खालच्या बाजूला रस्ता आहे. या ठिकाणाहून दिवसभर महामार्गाच्या कामावरील ट्रक ये-जा करत असतात. यामुळे रस्त्यालगतच्या शेतात मोठ्या प्रमाणात धूळ जाते. परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. सध्या तूर, हरभरा, गहू पीक शेतामध्ये उभे आहे. धुळीमुळे शेतामध्ये मजूर कामाला येत नाहीत. शेतकरीही या धुळीमुळे त्रस्त झालेले आहेत. नियमाप्रमाणे रस्त्यावर पाणी मारले जात नाही. दिवसातून तीनवेळा या रस्त्याला पाणी मारले पाहिजे, जेणेकरून धूळ उडणार नाही. परंतु, कंत्राटदार रस्त्यावर पाणीच मारत नसल्याने कंटाळून कल्याणा शिवारातील शेतकरी अनिरुद्ध तांगडे, अनंथा गारोळे, सोनू बोडखे, संतोष गारोळे, दिलीप काकडे यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर उभे राहात बुधवारी दुपारपासून कामावरील संपूर्ण वाहतूक बंद केली. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावल्याशिवाय वाहन पुढे जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शेतकरी तांगडे यांनी नियमानुसार दिवसातून तीनवेळा रस्त्यावर पाणी न मारल्यास शिवारातील सर्व शेतकरी एकत्र येऊन काम बंद पाडू, असा इशारा दिला.

धुळीमुळे पिकांच्या प्रकाश संश्लेषण व शोषण क्रिया बाधित

शेतातील पिकाला धुळीमुळे प्रकाश संश्लेषण व शोषण क्रिया ह्या बाधित होतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते.

महसूल व कृषी च्या वतीने संपूर्ण महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांची पिकाची पाहणी करून सर्वे केलेला आहे. संपूर्ण अहवाल आम्ही शासनदरबारी पाठविणार आहोत.

विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी,मेहकर.

Web Title: He stopped the road work with an ax in his hand