गणवेश न देणा-या शाळांचा अहवाल मागविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 00:18 IST2016-06-29T00:18:28+5:302016-06-29T00:18:28+5:30
लोकमत वृत्ताची दखल; शिक्षण विभागाने तात्काळ मागविला अहवाल.

गणवेश न देणा-या शाळांचा अहवाल मागविला
बुलडाणा : शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांना गणवेश देण्याचा नियम असतानाही जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश न देणार्या शाळांचा अहवाल शिक्षण विभागाने मंगळवारी तत्काळ मागविला आहे.
शाळा सुरू होण्याच्या आधीच्या दिवशीच विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचा गणवेश पोहोचायला हवा, असे स्पष्ट निर्देश शासनाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिले आहेत; मात्र त्यानंतरही या नियमांची पायमल्ली होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर मंगळवारी शिक्षण विभागाने पहिल्या दिवशी शाळांना गणवेश न देणार्या शाळांचा अहवाल उपशिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी मागविला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने अहवाल दिल्यानंतर गणवेश विद्यार्थ्यांना का मिळाला नाही? याची चौकशीही करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश देणे आवश्यक असतानाही गणवेश मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अलका चित्रांगण खंडारे यांनी मंगळवारी दुपारी उपशिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांना जाब विचारला. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही, त्याकरिता जबाबदार कोण, याचा अहवाल मागवून संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचनाही केल्या.