काँंग्रेसच्या केंद्रीय सचिवपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती
By Admin | Updated: April 27, 2017 01:52 IST2017-04-27T01:52:06+5:302017-04-27T01:52:06+5:30
बुलडाणा : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँंग्रेसच्या केंद्रीय सचिवपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती
बुलडाणा : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणिस जनार्दन व्दिवेदी यांनी बुधवारी दिल्ली येथे ही नियुक्ती घोषित केली. आ. हर्षवर्धन सपकाळ हे यापूर्वी राजीव गांधी पंचायत राज संघटन या कॉंग्रेसच्या सलंग्नित संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणिस व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या गुजरात प्रभारी चमूमध्ये स्थान देतानाच आ. हर्षवर्धन सपकाळ यांची सचिव म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यासोबतच खा. राजीव सातव व आ. वर्षा गायकवाड यांचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
गेल्या सहा वर्षांपासून आ. हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी युवक कॉंग्रेस व एन.एस.यू.आय. या युवकांच्या संबंधित दोन संघटनांचे प्रभारी म्हणूनसुद्धा कार्य केलेले आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांचा पंचायत राज व्यवस्थेतील अनुभव व अभ्यास लक्षात घेता गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्यावर राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. या संघटनेनंतर आता त्यांना अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा स्क्रिनिंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आला होता. सोबतच पंजाब विधानसभा निवडणुकीत केंद्रीय स्तरावरून स्थापित करण्यात आलेल्या कोअर कमिटीचेसुद्धा ते सदस्य होते. आ. हर्षवर्धन सपकाळ हे कॉंग्रेस विधिमंडळ पातळीवरसुद्धा अभ्यासू व आक्रमक आमदार म्हणून परिचित झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.