अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा
By Admin | Updated: April 10, 2015 02:28 IST2015-04-10T02:28:51+5:302015-04-10T02:28:51+5:30
निसर्ग कोपला; गारपिटीमूळे मेहकर तालुक्यात बैल, गाय व शेळी ठार.

अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा
मेहकर : तालुक्याला ९ एप्रिल रोजी सायंकाळी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीने तालु क्यातील बहुतांश गावांमध्ये कांदा बियाण्याचे नुकसान झाले आहे. कनका शिवारात गारपिटीने एक शेळी ठार, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. शहापूर शिवारात वीज कोसळून एक बैल ठार झाला, तर पांगरखेड येथे झाडाखाली दबून एका गायीचा मृत्यू झाला. तालुक्यात सायंकाळी ४ च्या सुमारास डोणगाव, घाटबोरी, लोणीगवळी, शेलगाव देशमुख, गोहोगाव दांदडे, पांगरखेड, बेलगाव, कनका, राजगड, विठ्ठलवाडी, शहापूर, भोसा परिसरातील गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. गोहोगाव येथील विजय दांदडे, शे. इस्माईल, सोपान भालेराव, रामभाऊ कानकटाव, ज्ञानबा सावकार, कडूभाई, रमेश सबरदिंडे, माणिक कानकटाव, शेलगाव देशमुख येथील सलामभाई, भानुदास शेळके, पांगरखेड येथील दत्ता येवतकर, गजानन राठोड, लक्ष्मण मांजरे, राजू सवडतकर, मधुकर सुर्वे यांच्याकडील साहित्याचे गारपिटीने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. पांगरखेड येथील सु. गा. सुर्वे यांची रस्त्यावर बांधलेली गाय झाडाखाली दबून जागीच ठार झाली. शहापूर येथील अनंत शेषराव नरवाडे यांच्या शेतात वीज कोसळून झामराव चिमा काळे यांच्या मालकीचा एक बैल ठार झाला तसेच परिसरातही शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. कनका येथील कडुजी तुकाराम राजेकर हे गावातीलच प्रभाकर त्र्यंबक ठोकळ यांच्या शेतात १५ शेळ्या चारण्याकरिता घेऊन गेले होते. वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीचा या १५ शेळ्यांना चांगलाच तडाखा बसला. एक शेळी ठार झाली, तर तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. कळपातील दोन शेळ्या बेपत्ता झाल्या आहेत. या गारपिटीने कडुजी राजेकर यांचे जवळपास दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीने अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली, तर शेतातील भाजीपाला व कांदा बियाण्यासह आंब्याचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यातील सोमठाणा, खापरखेड, महारचिकना, खळेगाव परिसरातही अवकाळी पावसासह गारपीट झाली.