खामगावात ४३ हजार रुपयांचा गुटखा पकडला; पोलिसांची धडक कारवाई
By अनिल गवई | Updated: September 25, 2022 10:38 IST2022-09-25T10:38:15+5:302022-09-25T10:38:33+5:30
आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात भादंवि कलम ३२८, २७२, २७३, तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ च्या विविध कलमान्वये २५ सप्टेंबरच्या पहाटे दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

खामगावात ४३ हजार रुपयांचा गुटखा पकडला; पोलिसांची धडक कारवाई
खामगाव: मानवी आरोग्यास अपायकारक असलेला तब्बल ४३ हजार रुपयांचा गुटखा साठा रविवारी पहाटे खामगाव-नांदुरा रोडवरील सुटाळा येथे पकडण्यात आला. दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी सापळा रचून अपायकारक गुटख्यासह मोटारसायकल असा एकूण ९७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक , मानवी जिवितास धोका दुखापत करणाºया गुटख्याची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांच्या डीबी पथकाला मिळाली. माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीसांनी सापळा रचला असता शेगाव येथील मोहसीन खान नसीम खान (३४ रा. बाजारफैल, मदिना मशीद जवळ, शेगाव.) हा एमएच २८ बीडी ९८२९ या मोटारसायकलवरून गुटख्याची अवैध वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील अवैध गुटखा, सुगंधीततंबाखू, पान मसाला असा एकुण ४२ हजार ७०० रुपयांचा गुटखा, ५० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल आणि पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ९७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात भादंवि कलम ३२८, २७२, २७३, तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ च्या विविध कलमान्वये २५ सप्टेंबरच्या पहाटे दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.