बुलडाणा जिल्ह्यात ५0 लाख रूपयांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: September 12, 2014 00:25 IST2014-09-11T22:40:55+5:302014-09-12T00:25:06+5:30
गुटखा पुड्यांची २१९ पोते जप्त; आरोपीस अटक; गुन्हा दाखल.

बुलडाणा जिल्ह्यात ५0 लाख रूपयांचा गुटखा जप्त
मलकापूर : गुटखा पुड्यांवर महाराष्ट्रात बंदी असताना, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पोलिसांनी गुरूवारी तब्बल ५0 लाख रूपयांचा गुटखा पुड्यांचा साठा जप्त केला.
गुटखा पुड्यांची अवैध विक्री बुलडाण्यात सर्रास सुरू असून, या जिल्ह्यातील मलकापूर शहरात अवैध गुटखा मोठा प्रमाणात आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार बुधवारी रात्रीच मलकापूर येथे दाखल झाले होते. या पथकाने सापळा रचून, गुरूवारी राधाकिसन चाळमधील जगदीश चिरंजीवलाल अग्रवाल यांच्या घरी तसेच गोदामावर छापा टाकला. यावेळी विमल व नजर या गुटखा पुड्यांची २१९ पोते आढळून आली. जवळपास ५0 लाख रूपयांचा हा संपूर्ण माल जप्त करण्यात आला. आरोपी जगदीश अग्रवाल यास अटक करून शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. अन्न व नागरी पुरवठा अधिकारी भाऊराव चव्हाण यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी जगदीश चिरंजीवलाल अग्रवाल याच्याविरुध्द भादंविचे कलम १८८, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा मानके कलम ५९ (१) (२) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.