ध्वजारोहणापूर्वी होणार बाबासाहेबांना अभिवादन
By Admin | Updated: January 28, 2015 23:33 IST2015-01-28T23:33:02+5:302015-01-28T23:33:02+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर.

ध्वजारोहणापूर्वी होणार बाबासाहेबांना अभिवादन
बुलडाणा : प्रत्येक प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणापूर्वी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे, असा ठराव बुधवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सर्वसंमतीने हा ठराव मंजूर करण्यात आला असून, असा ठराव घेणारी बुलडाणा जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अलका चित्रांगण खंडारे होत्या. मंचावर उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ, कृषी सभापती सुलोचना पाटील, महिला व बाल कल्याण सभापती आशा झोरे, समाजकल्याण सभापती गणेश बस्सी, बांधकाम सभापती अंकुश वाघ आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अँड. सुमीत सरदार यांनी हा ठराव मांडला. या ठरावाला विरोधी पक्षनेते अशोक इंगळे यांनी अनुमोदन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय स्वातंत्र्यलढय़ात असलेले योगदान व राज्यघटनेच्या निर्मितीमधील त्यांची भूमिका लक्षात घेता, प्रजासत्ताक दिनी त्यांना अभिवादन करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. या अनुषंगाने अँड. सरदार यांनी मांडलेल्या भूमिकेला सर्वांनी पाठींबा देत असा ठराव मंजूर केला आहे.