ग्रामसेविकेला मारहाण, गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 8, 2015 01:52 IST2015-04-08T01:52:18+5:302015-04-08T01:52:18+5:30
नांदुरा तालुक्यातील घटना.

ग्रामसेविकेला मारहाण, गुन्हा दाखल
नांदुरा (जि. बुलडाणा): नातेवाइकांचे काम का करत नाही, या कारणावरून सोनोने नामक दाम्पत्याने ग्रामसेविका राजश्री सोळंके यांना मारहाण केल्याची घटना ६ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी ग्रामसेविका सोळंके यांच्या तक्रारीवरून सोनोने पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामसेविका राजश्री विकासराव सोळंके रा. जिजाऊ नगर नांदुरा यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ६ एप्रिल रोजी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात भोटा ग्रामपंचायतच्या नाली बांधकामाचे अंदाजपत्रक घेण्यासाठी गेली असता सुरेश किसन सोनोने (वय ५६) व राधाबाई सुरेश सोनोने (वय ५0) वर्ष रा. विवरा ता. मलकापूर हे दोघे आले व तू आमचे नातेवाईक पांडुरंग खानजोडे रा. भोटा यांच्या घराचा नमुना आठ कोर्टाच्या कामासाठी का देत नाही, असे म्हणून माझ्या हातातील अंदाजपत्रक हिसकावले व माझ्या पाठीत सुरेश याने बुक्के मारले, तर राधाबाईने लोटून दिले. तसेच या दोघांनी अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून वरील आरोपींविरुद्ध कलम २९४,३५३,३३२,३४ भादंवि अँक्ट्रॉसिटी ३ (१) (१0) आ.जा.ज.प्र.कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर या करीत आहेत.