ग्रामसभा बळकटीकरणाला ‘मूळपत्रिके’चे कोंदण!
By Admin | Updated: May 16, 2016 01:26 IST2016-05-16T01:26:32+5:302016-05-16T01:26:32+5:30
चिखली तालुक्यातील मुंगसरी ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम.

ग्रामसभा बळकटीकरणाला ‘मूळपत्रिके’चे कोंदण!
सुधीर चेके पाटील /चिखली (जि. बुलडाणा)
गावच्या विकासाचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी व ग्रामपंचायतीचा कारभार पारदश्री व्हावा, यासह इतरही अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी गावपातळीवर ग्रामसभेला विशेष महत्त्व आहे. मात्र, ग्रामपातळीवर या ग्रामसभेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड अनास्था दिसून येते. अनेक गावांत ग्रामसभा होतच नाहीत, ज्या होतात त्या कागदोपत्नी होतात, त्यामध्ये ठरावही संमत होतात. ग्रामस्थांना त्याची पुसटसी कल्पनाही नसते. गावातील काही प्रतिष्ठित, सत्ताधारी एकित्रत येतात व त्यांच्या निर्णयांना ग्रामसभेचे निर्णय म्हणून नक्की करतात. तर ग्रामसभा घ्यायचा प्रयत्न केला तरी लोक जमतच नाहीत, त्यांचे महत्त्व त्यांना वाटत नाही, ही स्थिती गावपातळीवर सर्वदूर आहे. मात्र, हे चित्र बदलावे, ग्रामसभेचे बळकटीकरण व्हावे व प्रत्येक ग्रामसभेला ग्रामस्थांची १00 टक्के उपस्थिती लाभावी, या उदात्त हेतूने तालुक्यातील मुंगसरी ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला असून, ग्रामसभेचे निमंत्रण देण्यासाठी चक्क मूळपत्रिका त्यांनी छापल्या आहेत.
लग्न समारंभ असो अथवा सणवार सासरी नांदायला गेलेल्या लेकीला तसेच तिच्या सासरकडील मंडळींना सहकुटुंब आमंत्रण देणे व मुलीला माहेरी आणण्यासाठी आजही मुराळी परंपरा विशेषत: वर्हाडात जपल्या जाते. मात्र; काळ बदलला तसे या मुराळीचे स्वरूपही बदलले. पूर्वी साधे लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिकेसह शिदोरी व इतर मानपानाच्या प्रथा जोपासल्या जात होत्या. कालांतराने त्यात बदल झाला, बैलगाड्या कालबाहय़ झाल्या. शिदोरी प्रथा काही प्रमाणात कमी झाली. म्हणून अक्षतांचे पाकिटे व त्यासोबत जाण्या-येण्याचे भाडेही पाहुणे मंडळीने दिले जात होते. तो काळही मागे पडला आणि आता मुराळीची जागा घेतली आहे ती ह्यमूळपत्रिकेह्णने. एखाद्या घरात लग्नसमारंभाचा योग आल्यानंतर लगेच पत्रिका काढल्या जातात व त्या सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठीची धडपड सुरू होते. त्यातही निमत्रंण पाठवित असताना आप्तस्वकीय, जवळचे मित्न, नातेवाइकांना आवर्जून मूळपत्रिका दिल्या जातात. त्याचा परिणामही तसा सकारात्मक असतो. अमूक एका लग्नाची आपल्याला मूळपत्रिका दिली आहे, तेव्हा हे लग्न टाळणे शक्य नाही. अशी एक भावना प्रत्येकामध्ये निर्माण होते. ही सकारात्मक भावना गावाच्या विकासासाठी प्रत्येकाच्या मनात रूजावी व ग्रामविकासाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ग्रामसभेला गावातील प्रत्येकाने सहकुटुंब उपस्थित राहावे; यासाठी तालुक्यातील मुंगसरी ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, ग्रामसभेला नागरिकांची १00 टक्के उपस्थिती लाभावी, यासाठी चक्क ग्रामसभेचे निमंत्रण देणारी मूळपत्रिकाच त्यांनी काढली आहे. सुमारे ८00 लोकवस्तीचे मुंगसरी या गावाने सरपंच कल्पना गाडेकर यांच्या नेतृत्वात आदर्श ग्रामकडे वाटचाल चालविली आहे. तालुक्यातील पहिले हगणदरीमुक्त गाव म्हणूनही या गावाने लौकिक मिळविला आहे.