ग्रामपंचायतींना मिळणार ५६ कोटी!

By Admin | Updated: January 7, 2016 02:21 IST2016-01-07T02:21:43+5:302016-01-07T02:21:43+5:30

ग्रामविकास आराखड्याला चालना; निधी वितरणासाठी बुलडाणा जिल्हा परिषदेचा वित्त विभाग सरसावला!

Gram Panchayats get 56 crore! | ग्रामपंचायतींना मिळणार ५६ कोटी!

ग्रामपंचायतींना मिळणार ५६ कोटी!

बुलडाणा : चौदाव्या वित्त आयोगांतर्गत २0१५-१६ या वर्षासाठी दोन हप्त्यांपोटी ५६ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला. या निधीच्या संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्यामुळे ग्रामपंचायतींना हा निधी देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वित्त विभागाने बुधवारी यासंदर्भात हालचाली सुरू केल्या असून, प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार सदर निधी वळता केला जाणार आहे. आमचं गाव - आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार केल्या जाणार असून, १४ व्या वित्त आयोगामुळे या आराखड्याला मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. जिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषदेला पहिला हप्ता हा २६ कोटी ७६ लाख तर तेवढय़ाच रकमेचा दुसरा हप्ता जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला. हे दोन्ही हप्ते प्रत्येक ग्रामपंचायतच्या खात्यात वळते केले जाणार आहे. यासंदर्भात शासनाने निधी विनियोगाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्याने निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला. या निधीतून ग्रामपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठय़ाच्या स्त्रोतांचा विकास, वीज देयकात बचत करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी बांधकाम, सौर पथदिव्यांचा वापर करणे आदी कामे करण्याचा प्राधान्यक्रम २१ डिसेंबरला ठरवून दिला आहे. प्राधान्यक्रमानुसार ग्रामपंचायत स्थानिक गरजांच्या आवश्यकतेनुसार कामांचा ठराव करणार आहे. त्यानंतर या कामांची तालुकास्तरीय समितीकडे छाननी केली जाईल. या निधीतून करण्यात येणार्‍या कामांचा हिशेब व माहिती संगणकीय प्रणालीत संकलीत करणे अनिवार्य आहे. आर्थिक विषयक माहितीसुद्धा अपलोड करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर आहे, तर गटविकास अधिकार्‍यांवर कामांच्या संनियंत्रणाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. प्रत्यक्ष निधी वाटप होण्यासाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला असून, प्रत्येक ग्राम पंचायतच्या खात्यात हा निधी वळता केला जाणार आहे. शासनाने ग्रा.पं.च्या घरपट्टी वसुलीला शासनाकडून स्थगिती असल्याने ग्रामपंचायती अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमुळे विकास कामांना वेग येईल.

Web Title: Gram Panchayats get 56 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.