ग्रामपंचायत सदस्यांचे रस्त्यावरील पाण्यात बसून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:37+5:302021-07-23T04:21:37+5:30
नागापूर येथे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नाली सफाई नसल्याने नालीचे पाणी मुख्य मार्गावर साचून पाण्याचे मोठमोठाले खड्डे व डोह निर्माण ...

ग्रामपंचायत सदस्यांचे रस्त्यावरील पाण्यात बसून आंदोलन
नागापूर येथे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नाली सफाई नसल्याने नालीचे पाणी मुख्य मार्गावर साचून पाण्याचे मोठमोठाले खड्डे व डोह निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य धन्यकुमार खिल्लारी, देवानंद खोडके व सदस्य पती सय्यद याकूब यांनी वारंवार ग्रामपंचायतला नाली साफ करून रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकण्याची मागणी केली होती. या खड्ड्यांमुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा येत होता. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे; परंतु वारंवार मागणी करूनही सचिव याकडे दुर्लक्ष करीत असल्याने व गावात हजर राहत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे २२ जुलैला सकाळी ९ वाजता नागापूर येथील ग्राम पंचायत सदस्य धन्यकुमार खिल्लारी, देवानंद खोडके व सदस्य पती सय्यद याकुब यांनी या खड्ड्यात बसून गाजर गवत लावून आंदोलन केले. हे खड्डे व नाली सफाई न केल्यास गटविकास अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सात दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
आंदोलन सुरू असताना ग्रामसेवक मात्र गैरहजर होते. शेवटी विस्तार अधिकारी सोनोने यांनी हे आंदोलन मागे घेण्यात यावे, सात दिवसात समस्या मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामपंचायतने कोणतीही विकास कामे न केल्याने व निधीची विल्हेवाट लावल्याने या ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.
220721\new doc 2021-07-22 14.00.39_2.jpg
खड्ड्यात बसलेले ग्रामपंचायत सदस्य