लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम: ग्रामीण भागातील शेवटचा घटक सुखी करण्याची महापुरुषांची धारणा होती. कर्मयोगी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज आणि शुकदास महाराज या शेवटच्या घटकाला सुखी करण्यासाठीच झटले. त्यामुळे गाव पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत हीच मंदिर अशी धारणा ठेवून विकासासाठी झटावे, असे प्रतिसादन आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे भास्कर पेरे पाटील यांनी येथे केले.
स्वामी विवेकानंद जयंती उत्सवात बुधवारी ग्रामविकास या विषयावरील व्याखानात ते बोलत होते. सरपंच हा गावाचा खरा मालक असतो. त्यामुळे त्याने अतिशय जबाबदारीने वागणे महत्वाचे आहे. शाश्वत गाव विकासाची संकल्पना रुजविण्यासाठी मतदारांनीही सहकार्य करणे गरजेचे असते. मात्र, अलिकडच्या काळात लोकशाही मूल्य पायदळी तुडविल्या जाताहेत. पैसे घेऊन मतदान करणारा मतदार हा स्वत:च्या गावाच्या विकासात अडथळा निर्माण करीत असतो. तसे निवडून आलेले पुढारी पैसे खर्च केल्यामुळे तेवढे पैसे काढण्याच्या प्रयत्नात गावचा विकास विसरून जातात. अत्यंत साध्यासाध्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करीत आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्यावर महाराज वापरत असलेले शौचालय आजही बघायला मिळते. याचा अर्थ त्यांनी घाणीतून रोगराई निर्माण होऊ शकते. त्यांने रयतेचे आरोग्य खराब होऊ शकते हा विचार त्याकाळात केला होता. गावाला स्वच्छ पाणी,स्वच्छ परिसर,प्राथमिक शिक्षण व आरोग्य विषयक सुविधा पुरविणे हे प्रत्येक ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे. असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.
प्रत्येक व्यक्तीला दिवसाला पाच लिटर पाणी लागते. मात्र तेच पाणी स्वच्छ व निर्मळ नसेल तर आपले आरोग्य बिघडते. भांडी घासताना,धुणे धुतांना जे सांडपाणी विनाकारण वाहून जाते तेच पाणी शौच खड्डा करून त्यामध्ये ते सांडपाणी मुरल्यास जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते. म्हणून प्रत्येकाने सांडपाण्याचे नियोजन करावे जेणे करून भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. नवजात बालक जन्माला आल्यानंतर प्रथम त्याला ऑक्सिजची गरज असते त्यानंतर मातेच्या दुधाची असते. त्यामुळे झाडे लावा,झाडे जगवा हा आधुनिक काळातील मंत्र आहे त्याचा प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगिकार करावा. आपण आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी झाडे लावावे. रक्षाविसर्जन प्रसंगी पाण्यात रक्षा विसर्जनाची पध्दतीत काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. असल्याचे ते म्हणाले.