शासकीय तूर खरेदी पूर्ववत!
By Admin | Updated: April 20, 2017 01:25 IST2017-04-20T01:25:56+5:302017-04-20T01:25:56+5:30
नांदुरा : दोन दिवसांपूर्वी हमालांच्या कामबंद आंदोलनामुळे बंद पडलेली एफसीआयची तूर खरेदी १९ एप्रिलच्या सकाळी पूर्ववत सुरु झाली.

शासकीय तूर खरेदी पूर्ववत!
गैरप्रकारप्रकरणी कारवाई थंड बस्त्यात
नांदुरा : दोन दिवसांपूर्वी हमालांच्या कामबंद आंदोलनामुळे बंद पडलेली एफसीआयची तूर खरेदी १९ एप्रिलच्या सकाळी पूर्ववत सुरु झाली. मात्र यापूर्वी तूर खरेदीत झालेले गैरप्रकार, बाजार समितीची पो.स्टे. ला तक्रार, ग्रेडर खर्चे यांची बारदाणा हरविल्याची तक्रार याबाबत आतापर्यंत कोणावरच कारवाई न झाल्याने प्रशासनच गैरकारभारला अभय देत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत.
नांदुरा बाजार समिती यार्डात ३ मार्चला तूर खरेदीतील अनागोंदी कारभारावरुन तुरीचा साठा जप्त करुन एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ११ एप्रिलच्या रात्री काही हमालांना तुरीचा माल एफसीआयच्या पोत्यांमध्ये भरतांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यावरुन बाजार समितीने त्या हमालांविरुध्द १२ ला पो.स्टे.नांदुराला लेखी तक्रार दिली. काही हमालांना ताब्यात घेवून त्यांची चौकशीही करण्यात आली. मात्र हमालांनी चौकशी दरम्यान ज्यांची नावे सांगितली त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याचे निवेदन देवून हर्रासी बंद पाडण्यात आली होती. मागील चाळीस दिवसांपासून तूर विक्रीच्या प्रतिक्षेत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्तारोको करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान बाजार समितीने शासकीर तूर खरेदी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे १९ एप्रिलच्या सकाळी पुन्हा तूर खरेदी पूर्ववत झाली आहे.
मात्र मागिल दीड महिन्यापासून तूर खरेदीत हेराफेरी होत असल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. ३ मार्चला याबाबत पंचनामा करुन तुरीचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यामधील काही साठा गायब झाल्याचा आरोप शेतकऱ्यांचा प्रशासनावर आहे. त्याबाबत अद्यापही ठोस कारवाई प्रशासनाने केली नाही. ११ एप्रिल रोजी रात्रीच्या अंधारातील एफसीआयच्या तूर खरेदीचा भांडाफोड शेतकऱ्यांनी केला. त्यावर बाजार समितीने पो.स्टे.ला तक्रार दिली. हमालांची चौकशी झाली मात्र ठोस कारवाई अजूनही झालीच नाही. ग्रेडर खर्चे यांचा सहाशे पन्नास पोते बारदाणा चोरीला गेला. त्याची तक्रार त्यांनी पो.स्टे.ला करायला हवी होती. ती त्यांनी बाजार समितीला केली. व कारवाई झालीच नाही.
गैरकारभाराला अभय दिले जात असल्याचा आरोप
या सर्व शासकीय खरेदीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सहाय्यक निबंधक कृपलाणी यांची आहे. पण त्यांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी नरोवा-कुंजरोवाची भूमिका घेतल्याने हे सर्व गैरकारभार वाढले आहेत. त्यामुळे गैरकारभाराला आळा घालणे सोडून अभय दिल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.
बाजार समितीने शासकीय तूर खरेदी पूर्ववत सुरु केली असून शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी जलदगतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी अफवांना बळी पडू नये
- निळकंठराव भगत, सभापती, कृउबास नांदुरा