गोरसेनेचे रास्ता रोको आंदोलन
By Admin | Updated: August 25, 2014 02:23 IST2014-08-25T02:05:40+5:302014-08-25T02:23:47+5:30
गोरबंजारा समाजाचा अनुसूचितजातीत समावेश करा या मागणीसाठी बुलडाणा-चिखली रस्त्यावर रास्ता रोको.

गोरसेनेचे रास्ता रोको आंदोलन
बुलडाणा : गोरबंजारा समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी गोरसेनेच्या कार्यकर्त्यांंनी विविध घोषणा देत बुलडाणा ते चिखली रस्त्यावर रास्ता रोको करुन शासनाचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलनकर्त्यांंना अटक करुन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. यापूर्वीही गोरसेनेच्या वतीने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा रास्ता रोको म्हणजे या आंदोलनाचा दुसरा टप्पा होता.
गोर बोली भाषेला भाषेचा दर्जा देण्यात यावा, गोर तांड्यापासून गाव बाजारपेठांना जोडणारे बारमाही पक्के रस्ते तयार करावे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात यावी, गोरबंजारा समाजाच्या विकासासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात निधीची तरतूद करावी, शाळा महाविद्यालयात प्रवेश घेताना शुल्क माफी मिळावी, एस.सी., एस.टी. प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किरण कुरंदकर यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण आडे यांनी केले. या आंदोलनात विलास राठोड, रितेश पवार, सुभाष आडे, विनोद चव्हाण, प्रल्हाद राठोड, डॉ.विजय राठोड, वितेश चव्हाण, प्रमोद आडे, संदिप देवकर, एकनाथ चव्हाण आदी सहभागी झाले होते. यावेळी खा.जाधव यांच्याशी पदाधिकार्यांनी चर्चा करून गोरेसेनेच्या मागण्याची त्यांना सविस्तर माहिती दिली. खा.जाधव यांनीही या मागण्या जाणून घेत त्याला संसदीय स्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. त्यानंतरच खासदारांची गाडी आंदोलनकर्त्यांनी सोडली. जवळपास २0 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.