पक्ष बदलणा-यांना ‘अच्छे दिन’!

By Admin | Updated: March 22, 2017 02:01 IST2017-03-22T02:01:46+5:302017-03-22T02:01:46+5:30

भाजपाकडे ओढा वाढला; आयारामांमुळेच भाजप झाली प्रबळ.

'Good days' to party changers! | पक्ष बदलणा-यांना ‘अच्छे दिन’!

पक्ष बदलणा-यांना ‘अच्छे दिन’!

विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. २१- वर्षानुवर्षे एकाच पक्षाच्या सतरंज्या उचलण्याऐवजी संधीचा शोध घेऊन पक्ष बदलणार्‍या नेत्यांनाच अच्छे दिन आले असल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडीतून स्पष्ट होत आहे. कधीकाळी काँग्रेसचे कट्टर असलेले शिवचंद्र तायडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अध्यक्षपद मिळविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे व भाजपच्या नवीन नगराध्यक्षांवरून पक्ष बदलणार्‍यांना ह्यअच्छे दिनह्ण आल्याचे निदर्शनास येत आहे.
गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूूर्णत: बदलली आहेत. भाजपच्या सत्तेचे वारे सर्वत्र वाहत असल्यामुळे अनेक नेते सध्या भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपला भरती तर अन्य पक्षांना ओहोटी लागली आहे. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत याचा प्रत्यय आला. नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविलेले शिवचंद्र तायडे पूर्वी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी केंद्रिय मंत्री मुकुल वासनिक यांच्यावर आक्षेप घेत पक्ष सोडला. काही महिन्यांपूर्वीच पत्र प्रकरण जिल्ह्यात बरेच गाजले. मुकुल वासनिक यांनी मराठा समाजाच्या नेत्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली व सरळ अध्यक्षपद मिळविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे हेही पूर्वी काँग्रेसमध्येच होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत व्हाया राष्ट्रवादी ते भाजपमध्ये आले व भाजपने त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले. जिल्हा परिषद निवडणुकीतही देऊळगाव मही जि. प. सर्कलमध्ये संजय वडतकर शिवसेना सोडून भाजपात आले व विजयी झाले. मनसेचे विनोद वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला व जिल्हा परिषदेत विजयी झाले.
मालूबाई मानकर यांनी पक्षबदल केला व जिल्हा परिषदेत विजय मिळविला. दुसर्‍या पक्षातून प्रवेश करणार्‍यांना भाजप संधी देत असल्याचा संदेश जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीतून गेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये येणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Good days' to party changers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.