दोन घरांसह गोडाउनला आग
By Admin | Updated: April 20, 2017 01:23 IST2017-04-20T01:23:47+5:302017-04-20T01:23:47+5:30
संग्रामपूर : तालुक्यातील चांगेफळ बु. येथे महावितरण कंपनीच्या पोलवरील तारांमध्ये घर्षण झाल्याने दोन घरांसह एका गोडाउनला आग लागली.

दोन घरांसह गोडाउनला आग
संग्रामपूर : तालुक्यातील चांगेफळ बु. येथे महावितरण कंपनीच्या पोलवरील तारांमध्ये घर्षण झाल्याने दोन घरांसह एका गोडाउनला आग लागली. या आगीत घरातील जीवनोपयोगी साहित्य धान्य, रोख रक्कम १० हजार रूपये तसेच गोडाउनमधील साहित्य आगीत भस्मसात झाले. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली.
चांगेफळ बु. येथे जळगाव जामोद रस्त्यावर रतन वासुदेव खंडारे, कमला सुपडा जाधव यांची दोन घरे व श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांचे या दोन घराजवळ गोडाऊन आहे. याच घराच्या बाजूला महावितरण कंपनीची मेन लाइन या घराजवळूनच जाते. दरम्यान, १ वाजेदरम्यान या महावितरण कंपनीच्या मेन लाइनच्या पोलजवळील तारामध्ये घर्षण झाल्यामुळे पोलच्या खाली असलेल्या गवताला आग लागली व पाहता पाहता ही आग दोन घरापर्यंत पोहोचली व या आगीने रौद्ररूप धारण करून या आगीत रतन वासुदेव भडारे, कमलाबाई सुपडा जाधव, यांची दोन घरे व श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांचे गोडाउन या आगीत काही क्षणातच भस्मसात झाले. या आगीमध्ये रतन वासुदेव खंडारे यांचे घरातील रोख रक्कम १० हजार रुपये, घरातील सर्व कपडे, सर्व भांडे, गहू ३ पोते व इतर धान्य, २ सायकली, वीणा, टाळ, मृदंग, महत्त्वाची सर्व कागदपत्रे, पत्रे, धान्य टाकी व संपूर्ण घर या आगीत भस्मसात झाले. तर कमलाबाई सुपडा जाधव यांचे घरातील २ पोते गहू, ५ पत्रे व पोते ज्वारी, सात ग्रॅम सोन्याची पोत, १ गॅस सिलिंडर व संपूर्ण घर या आगीत भस्मसात झाले, तर श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांचे गोडाउनमधील २० ताट्या, २० पत्रे व बैलगाडी व गोडाउन या आगीत भस्मसात झाले. या आगीमध्ये रतन वासुदेव खंडारे यांच्या घराला आग लागल्यामुळे ५० हजाराचे नुकसान झाले, तर कमलाबाई सुपडा जाधव यांच्या घराला आग लागल्यामुळे ३० हजाराचे नुकसान झाले तर श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांच्या गोडाउनला आग लागल्यामुळे त्यांचे २० हजाराचे नुकसान झाले आहे.