सारोळापीर ग्रा.पं.च्या सरपंचपदी गोदावरी शिंदे
By Admin | Updated: October 17, 2015 01:47 IST2015-10-17T01:47:22+5:302015-10-17T01:47:22+5:30
गुप्त मतदान पद्धतीने झाली निवडणूक.

सारोळापीर ग्रा.पं.च्या सरपंचपदी गोदावरी शिंदे
मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील सारोळापीर ग्रामपंचायतीच्या काल गुरुवारला झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये गोदावरी ईश्वर शिंदे यांची सर पंचपदी गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली. मागील ऑगस्ट महिन्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये सारोळापीर ग्रामपंचायतीचीसुद्धा निवडणूक घेण्यात आली होती; मात्र सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीचे निघाले असल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक घेता आली नाही. निवडणूक विभागाने सारोळापीर ग्रामपंचायतीचे आरक्षण बदलवून त्या जागी ओबीसीकरिताचे सरपंचपदाचे आरक्षण काढले. त्या प्रमाणे १५ ऑक्टोबरला सरपंच पदाकरिताची निवडणूक घेण्यात आली. ग्राम पंचायतीमध्ये आयोजित या सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून आर.जी. बघेले (मंडळ अधिकारी) हे होते. यावेळी सभेत उपस्थित ग्रा.पं. सदस्य दुर्गाबाई सोपान चोपडे यांनी सरपंचाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात यावी, अशी लेखी स्वरूपात मागणी केली.