सरकारी जागेत राहणाऱ्यांना आठ अ नक्कल द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:54+5:302021-02-05T08:32:54+5:30
पंचायत समितीसमाेर उपाेषण करण्याचा इशारा अमडापूर : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून सरकारी जागेत ग्रामपंचायत हद्दीत ...

सरकारी जागेत राहणाऱ्यांना आठ अ नक्कल द्या
पंचायत समितीसमाेर उपाेषण करण्याचा इशारा
अमडापूर : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून सरकारी जागेत ग्रामपंचायत हद्दीत गावात राहणाऱ्या विभक्त कुटुंबांना राहत्या जागेची ग्रामपंचायत आठ रेकॉर्डला नोंद घेऊन आठ नक्कल द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास चिखली पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
चिखली तालुक्यातील सर्वच गावांत विभक्त कुटुंब अनेक वर्षांपासून सरकारी जागेत ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करून राहत असून, सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहे. त्यांना आठ नक्कल नसल्यामुळे नवीन शिधापत्रिका मिळत नाही. शिधापत्रिका नसल्यामुळे अन्नधान्य मिळत नाही. ही कुटुंबे शेतमजुरी, हमाली, घरकाम, लघुउद्योग करून आपला उदरनिर्वाह करतात. तसेच यामध्ये अपंगबांधवसुद्धा आहेत. या कुटुंबांना आठ नक्कलची अत्यंत आवश्यकता असून त्यांना राहत असलेल्या जागेची ग्रामपंचायत रेकॉर्ड होणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या जागेची नोंद झाल्यास ग्रामपंचायत करातसुद्धा वाढ होईल व गावातील विकासकामाकरिता सामान्य फंड जमा होईल. चिखली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत विकास अधिकारी यांनी अतिक्रमण करून राहणारे कुटुंबांचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायत रेकॉर्डला सदर जागेची नोंद घेऊन रहिवाशांना आठ नक्कल देण्यात यावी, अन्यथा १० मार्च रोजी चिखली पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग चिखली तालुक्याच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य उन्द्री रफीक शेख यांच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर रफीक शेख, शेख अब्दुल कादीर गफार (ता. उपाध्यक्ष), शेख काजीम शेख गफ्फार, शेख कलीम शेख शब्बीर, घनश्याम मदगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.