कारेगाव येथे घागर मोर्चा
By Admin | Updated: May 9, 2017 01:39 IST2017-05-09T01:39:35+5:302017-05-09T01:39:35+5:30
महाजल योजना ठरली कुचकामी; पाण्यासाठी महिलांची भटकंती.

कारेगाव येथे घागर मोर्चा
कारेगाव : येथील गावकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी येथील महिलांनी शनिवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.
लाखो रूपये खर्च करून शासनाने कारेगावसाठी महाजल योजना उभारली मात्र, या महाजल योजनेमध्ये झालेल्या अनियमितपणामुळे या योजनेतून पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे महाजल योजनाही येथे कुचकामी ठरत आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुध्दा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. कारेगावसाठी ७0 लाख रूपये खर्चुन महाजल योजने अंतर्गत कोनाटीच्या धरणावरुन पाईपलाईन करण्यात आली. पाणी साठविण्यासाठी गावात टाकीही बांधण्यात आली. मात्र, या पाईपलाईन मधून गावाकर्यांना एकदिवसही पाणी मिळाले नाही. अखेर गावकर्यांनी तंटामुक्तीच्या निधीमधून पाणी साठवविण्यासाठी दुसरी टाकी बांधली. तरी सुद्धा महाजल योजनेचे पाणी गावकर्यांना कधी मिळते तर कधी मिळत नाही. महिलांना रात्री बेरात्री मिळेल तेथून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. अखेर कंटाळलेल्या महिलांनी हातात हंडे घेवून शनिवारी ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी मिना हाडे, छाया चव्हाण, गयाबाई चव्हाण, जिजाबाई चव्हाण, रत्नमाला आवारे, कालिंदाबाई डव्हळे, लताबाई गुंगे, लंकाबाई गायकवाड, गिताबाई चव्हाण यांच्यासह मोहन हाडे, भास्कर गुंगे, विठ्ठल गायकवाड, सुनिल हाडे, विलास गुंगे, धम्मपाल वानखेडे, दादाराव वानखेडे, शेषराव वानखेडे, गणेश डव्हळे, सुधीर चव्हाण, विष्णू चव्हाण, शेषराव केंधळे हे गावकरी मोर्चात सहभागी झाले होते. आतातरी कारेवाग येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाने कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी गावकर्यांनी यावेळी केली.