काम मागत तिने मुलालाच सचिवापुढे आपटले
By Admin | Updated: January 23, 2015 01:51 IST2015-01-23T01:51:37+5:302015-01-23T01:51:37+5:30
खामगाव बाजार समितीतील घटना; पोलिसांना पाचारण.

काम मागत तिने मुलालाच सचिवापुढे आपटले
खामगाव (जि. बुलडाणा): रात्रपाळीची ड्युटी करण्यास नकार दिला म्हणून महिलेने आपल्या मुलास कृउबास सचिवांसमोर आपटले. ही घटना आज २२ जानेवारी रोजी स्थानिक कृउबासमध्ये दुपारी घडली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.
येथील कृउबासमध्ये ज्योती भरत ही महिला रात्रपाळीत कृषीमालाचे राखन करीत होती. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्योती भरत ही महिला अडते व्यापार्यांच्या गंजीवर रात्रपाळीवर कामावर असायची. त्या मोबदल्यात तिला संबंधित अडते व्यापारी पगार द्यायचे. त्यावरच तिचा उदरनिर्वाह चालायचा; मात्र गेल्या एक महिन्यापासून वाढत्या चोर्यांचे प्रमाण लक्षात घेता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे राहुल अबगड सेक्युरिटी ऑफिसर्स यांच्यासह ७ सुरक्षा रक्षक व २ बाजार समितीचे कर्मचारी असे एकूण ९ कर्मचारी तैनात केले आहेत.
हे कर्मचारी रात्र पाळीवर राहून शेतकर्यांच्या व व्यापार्यांचा माल चोरीपासून वाचवत आहे; मात्र रात्रीची ड्युटी करण्यास सुरक्षा रक्षकांकडून नकार मिळाल्याने ज्योती भरत हिने आज आपल्या ४ वर्षाच्या मुलास सोबत घेऊन सचिव मुगुटराव भिसे यांच्या कार्यालयात रात्रपाळीची ड्युटी देण्याचा आग्रह धरला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर महिलेस रात्रपाळीची ड्युटी नाकारण्यात आली, त्यामुळे ज्योती भरत हिने मुलास आपटले. या प्रकारामुळे बाजार समितीमध्ये एकच खळबळ उडाली. समितीच्या कर्मचार्यांनी तत्काळ भुसावळ चौकीच्या पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सदर महिलेची समजूत काढली व रात्री ११ पर्यंत तुम्ही काम करा; मात्र रात्री काम नियमाप्रमाणे दिले जाणार नाही, असे सांगून त्या महिलेला रवाना करण्यात आले.