जेनेरिक मॉलचा उपक्रम राज्यभर पोहोचविणार!

By Admin | Updated: January 6, 2017 02:29 IST2017-01-06T02:29:11+5:302017-01-06T02:29:11+5:30

मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन: सिद्धविनायक जेनेरिक मॉलचे उद्घाटन.

Generic Mall to be brought to the state! | जेनेरिक मॉलचा उपक्रम राज्यभर पोहोचविणार!

जेनेरिक मॉलचा उपक्रम राज्यभर पोहोचविणार!

चिखली, दि. ५- आपल्या तुटपुंज्या कमाईत संसाराचा गाडा हाकताना महागड्या औषधोपचारामुळे आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणार्‍यांची संख्या समाजात लक्षणीय आहे. अशा लोकांना नवसंजीवनी ठरावी व त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, या हेतूने आ.राहुल बोंद्रे यांनी बाजारात सर्वाधिक स्वस्त मात्र गुणवत्तेच्या बाबतीत किंचतीही कमी नसलेली जेनेरिक औषध या भागात जनतेला उपलब्ध करून देण्याचे काम सिद्धविनायक मेडिकल मॉल व समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून केले आहे. त्यांच्या या कार्याने आपण प्रभावित झालो असून, आज प्राथमिक स्तरावर त्यांनी उभा केलेला हा प्रकल्प व त्यांचे परिणाम पाहता नाम फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प संपूर्ण राज्यभर राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले.
स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी संचालीत सिद्धविनायक मेडिकल मॉलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश छाजेड तर प्रमुख उपस्थितांमध्ये बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, चिखली मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र गुप्ता, इंडियन मेडिकल असो. चे डॉ. अजाबराव वसु, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, आमदार राहुल बोंद्रे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.व्ही. आर. यादव, जनुभाऊ बोंद्रे, बाबूराव पाटील, हिरकणी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक वृषाली बोंद्रे, आत्माराम देशमाने, सिद्धेश्‍वर वानेरे, अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी, प्राचार्य डॉ. आर. एच. काळे व प्राचार्य डॉ.अरुण नन्हई, प्राचार्य डॉ. भांबेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार राहुल बोंद्रे यांनी जेनेरिक मेडिकल मॉल व समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी दिलेल्या रुग्णसेवेच्या विचाराने प्रेरित होऊन हा समाजसेवेचा उपक्रम आम्ही हाती घेतला असून, या मॉलला भेट देणारे समाजातील गोरगरीब, कष्टकरी, जनसामान्यांसाठी याठिकाणी उच्चप्रतिची; परंतु स्वस्त औषध देण्याबरोबरच रुग्णांना समुपदेशन करण्याचे कामही आमच्या अनुराधा फार्मसीची चमू करणार असल्याचे स्पष्ट केले, तर अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सुरेश छाजेड यांनी जेनेरिक औषधाचे महत्त्व व जनसामान्याच्या जीवनातील त्याची आवश्यकता, याविषयी माहिती देऊन बुलडाणा जिल्हय़ात प्रथमच जेनेरिक मेडिकल मॉलबरोबरच समुपदेशन केंद्र सुरु करणारे या उपक्रमाचे कौतुक करुन हे चागंले कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रसंगी राधेश्याम चांडक, राजेंद्र काळे यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्तविक प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी यांनी केले.
यावेळी डॉ. बेदमुथा, काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, कैलास खंदारे, अतहरोद्दीन काझी, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, पं.स.सभापती लक्ष्मणराव अंभोरे, उपसभापती दयानंद खरात, जि.प.सदस्य अशोक पडघान, पीरिपाचे भाई विजय गवई, जितेंद्र बोंद्रे, नगरसेवक अ.रफीक, अ.रउफ, सुनील कासारे, प्रदीप पचेरवाल, सचिन बोंद्रे, दीपक खरात, दीपक देशमाने, बिंदुसिंग इंगळे, डॉ. गुलाबराव सपकाळ यांची उपस्थिती होती. संचालन करून आभार प्रा. उन्मेश जोशी व गणेशकर यांनी मानले.

Web Title: Generic Mall to be brought to the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.