‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे अमेरिकेत होणार पारायण!
By Admin | Updated: April 9, 2017 00:09 IST2017-04-09T00:09:17+5:302017-04-09T00:09:17+5:30
भक्त परिवारातर्फे विद्या पडवळ यांच्या मुखोद्गत पारायणाचे कार्यक्रम एप्रिल व जून महिन्यात होणार आहेत.

‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे अमेरिकेत होणार पारायण!
शेगाव: श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाचा कार्यक्रम अमेरिकेतील १0 शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. संत श्री गजानन महाराजांचा भक्त परिवार अमेरिकेतही असून या भक्त परिवारातर्फे विद्या पडवळ यांच्या मुखोद्गत पारायणाचे कार्यक्रम एप्रिल व जून महिन्यात होणार आहेत. विद्या पडवळ यांचा संपूर्ण गजानन विजय ग्रंथ तोंडपाठ आहे. ग्रंथातील ३६६९ ओव्या त्या न पाहता म्हणतात. त्या एकाच बैठकीत म्हणजे साधारण ६-७ तासात एक पारायण पूर्ण करतात. अशाप्रकारे त्यांनी आतापर्यंत २00 हून अधिक पारायणे केलेली आहेत. त्यांची पारायण करण्याची शैली अप्रतिम व अद्वितीय आहे. त्या प्रसंगानुरूप वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढून व वेगवेगळ्या भावमुद्रा करून ग्रंथातील प्रसंग सादर करतात, जे ऐकून आपल्याला प्रत्यक्ष महाराजांच्या काळात असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे संत श्री गजानन महाराज भक्त परिवार अमेरिका यांच्यातर्फे पडवळ यांचा श्री गजानन विजय ग्रंथाचा मुखोद्गत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पडवळ ह्या अमेरिकेत साधारणत: तीन महिने वेगवेगळ्या १0 ठिकाणी मुखोद्गत पारायण करणार आहेत.
या ठिकाणी होणार कार्यक्रम
सिअँटल (वॉशिंग्टन) येथे शनिवार, ८ एप्रिल २0१७ रोजी सकाळी ८ वाजता श्री साई मंदिरात ह्यश्रींह्णची मूर्ती स्थापना होईल व लगेच मुखोद्गत पारायणाला सुरु वात होईल. यानंतर शेनेक्टॅडी (न्यूयॉर्क) येथे शनिवार, १५ एप्रिल रोजी पारायणाचा कार्यक्रम होणार आहे. नेपरविले (शिकागो) येथे शनिवार, २२ एप्रिल रोजी, फोनिक्स (एरिझोना) येथे शनिवार, २९ एप्रिल, फिलाडेल्फिया (पेनसिल्वेन्या) येथे शनिवार, १३ मे, डेलास (टेक्सास) येथे शनिवार, २0 मे, सॅन फ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया) येथे 0३ जून, ऐटलांटा (जॉर्जिया) येथे शनिवार, १0 जून, बोस्टन येथे शनिवार, १७ जून तर न्यू जर्सी येथे शनिवार, २४ जून रोजी कार्यक्रम होणार आहेत.