शहिद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:51 IST2020-04-20T11:49:57+5:302020-04-20T11:51:26+5:30
नागरिकांनी आपल्या लाडक्या जवानाला ‘चंद्रकांत भाकरे अमर रहे.. ! च्या जयघोषात अखेरचा निरोप दिला.

शहिद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पातुर्डा ता. संग्रामपूर: काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले येथील सिआरपीएफ जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात २० एप्रिलरोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग पाळत उपस्थित नागरिकांनी आपल्या लाडक्या जवानाला ‘चंद्रकांत भाकरे अमर रहे.. ! च्या जयघोषात अखेरचा निरोप दिला. १८ एप्रिलरोजी चंद्रकांत भाकरे यांच्यासह तिघे जवान काश्मिरमधील दहशतवाद्यांशी लढतांना शहिद झाले होते. २० एप्रिलरोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता पातुर्डा येथे गावातून मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम पोलिसांची व्हॅन यानंतर फुलांनी सजवलेल्या रथात शहिद जवान चंद्रकांतचे पार्थीव,यानंतर पुन्हा मागे सॅनिटायझेशन स्प्रे व सुरक्षा व्हॅन. यानंतर पाच पावले चालणारे नागरिक अशाप्रकारे आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी आपल्या अंगणातून, गच्चीवरून आपल्या लाडक्या जवानावर पृष्टवृष्टी करीत अखेरचे दर्शन घेतले. पातूर्डा ग्रामपंचायतने तीन क्विंटल फुलांच्या पाकळ््या घरोघरी पोहचवल्या होत्या. घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनीही त्यास प्रतिसाद दिला. पातुर्डा फाट्यालगत भूषण रोठे यांच्या शेतात शहिद जवान चंद्रकांतच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासन, प्रशासन, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पोलिस, महसूल प्रशासन व पंचायत राज प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.