शालेय गणवेश योजनेचा निधी अडकला
By Admin | Updated: January 14, 2015 23:46 IST2015-01-14T23:46:00+5:302015-01-14T23:46:00+5:30
मोताळा तालुक्यातील ३६ शाळांचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित.

शालेय गणवेश योजनेचा निधी अडकला
मुरलीधर चव्हाण / मोताळा (बुलडाणा):
शालेय सत्र सुरू होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही तालुक्यातील ३६ प्राथमिक शाळांमधील पात्र विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित आहेत. शालेय गणवेश योजनेसाठी निधी अपुरा पडल्यामुळे विद्यार्थ्यांंना दोनऐवजी एकच गणवेश मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
शैक्षणिक वर्ष २0१४-१५ करिता खरेदी करावयाच्या गणवेशाला निधी अपुरा पडल्यामुळे मोताळा तालुक्यातील ३६ प्राथमिक शाळांतील पात्र विद्यार्थी एका गणवेशापासून वंचित राहिले आहेत.
मोताळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या १२0 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. जि.प. प्राथमिक शाळांच्या पहिली ते चौथ्या वर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांंना सदर गणवेश योजनेतंर्गत प्रत्येकी दोन तथा उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग पाचवी ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांंना सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत प्रत्येकी दोन गणवेश वितरित केले जातात. तालुक्यातील एकूण १२0 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील गणवेश योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांंची संख्या १३ हजार ६६0 एवढी आहे. यामध्ये राज्य सरकार शालेय योजनेंतर्गत ६ हजार ५३९ तथा सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत ७ हजार १२१ विद्यार्थ्यांंचा समावेश आहे.
शैक्षणिक वर्ष सन २0१४-१५ करिता सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत २८ लाख ४८ हजार ४00 रुपयांचा निधि मिळाला होता. प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी प्रतिगणवेश २00 रुपये प्रमाणे वर्ग पाचवी ते आठवीच्या ७ हजार १२१ पात्र विद्यार्थ्यांंंना दोन टप्प्यात गणवेशाचे वितरण करण्यात आले.
राज्य सरकार शालेय योजनेंतर्गत वर्ग पहिली ते चौथीचे ६ हजार ५३९ पात्र विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी १३ लाख ७ हजार ८00 रुपये निधीची गरज असताना अवघा ८ लाख ८३ हजार १५६ रुपयांचा अपुरा निधी मिळाला. त्यामुळे तालुक्यातील ३६ शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांंनी अध्रे सत्र एकाच गणवेशावर काढावे लागत आहे.
यासंदर्भात गटशिक्षण अधिकारी अनिल अकाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य सरकार शालेय योजनेंतर्गत जिल्हास्तरावरून जेवढा निधी प्राप्त झाला, त्या निधीमधून गणवेशाचे वितरण करण्यात आले आहे. अपुर्या निधीबाबत माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. शालेय स्तरावर आवश्यक तेवढय़ा निधीची पूर्तता झाल्यावर गणवेशाचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.