९५ हजार शेतक-यांचा मदत निधी रखडला
By Admin | Updated: March 10, 2015 02:02 IST2015-03-10T02:02:41+5:302015-03-10T02:02:41+5:30
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ अनुदानाचे ७0 टक्के वाटप; बॅंक खाते नसल्याने निधी वाटपात अडसर.

९५ हजार शेतक-यांचा मदत निधी रखडला
बुलडाणा : दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा निधी दोन ट प्प्यात बुलडाण्याला प्राप्त झाला. या निधीचे वाटप तत्काळ करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले; तसेच तालुकास्तरावर निधीही वितरीत केला; मात्र तब्बल ९५ हजार ३६८ शेतकर्यांचे बँक खाते नसल्याने अजूनही ३0 टक्के निधी वाटप होऊ शकला नाही, ही बाब सोमवारी समोर आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात पिके शेतकर्यांच्या हातून गेली. यामुळे जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ४ लाख ७६ हजार ८४१ लाख शेतकर्यांना या दुष्काळाचा फटका बसला आहे. या शेतकर्यांना एकूण २८७ कोटी ९४ लाखाची मदत जाहीर करण्यात आली असून, त्यापैकी २३९ कोटी ५३ लाखाची मदत प्राप्त झाली आहे. या मद तीचे वाटप जानेवारी ७ मार्चनंतर हा निधी शासनाकडे परत जाणार, अशी सूचना आल्यानंतर निधी वाटपाला गती आली असून, येत्या आठवडाभरात संपूर्ण वितरण केले जाईल, असे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी दिली. शासनाकडून आलेली मदत ही संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार बँकांकडे २१२ कोटी ४0 लाखाची रक्कम वळती करण्यात आली आहे. त्यापैकी १६९ कोटी ९२ लाखांची रक्कम शेतकर्यांच्या खात्यातही जमा झाली असून, उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.