जलसंधारणाच्या कामासाठी मिळणार मोफत जेसीबी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 15:50 IST2020-01-15T15:50:33+5:302020-01-15T15:50:51+5:30
जलसंधारणाच्या कामासाठी शेतकरी व ग्रामपंचायतींना मोफत जेसीबी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जलसंधारणाच्या कामासाठी मिळणार मोफत जेसीबी!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील भारतीय जैन संघटनेचा जलसंधारणाचा पॅटर्न राज्यभर गाजला आहे. पावसाळ्यानंतर या मोहिमेची नव्याने तयारी सुरू झाली आहे. जलसंधारणाच्या कामासाठी शेतकरी व ग्रामपंचायतींना मोफत जेसीबी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा अभिनव उपक्रम जानेवारी व फेब्रुवारी महिन्यासाठी राबविण्यात येत आहे.
सुजलाम् सुफलाम प्रकल्पाअंतर्गत भारतीय जैन संघटनेने आता जिल्ह्यातील गावांना जेसीबी मशीन देण्याचे ठरविले आहे. ज्या ज्या गावांना नव्याने जलसंधारणाची कामे करायची आहेत, त्यांना ही मशीन मागणीनुसार देण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामपंचायती, प्रगतशील शेतकरी, शेतकरी मंडळे यांच्यामार्फत प्रस्तावित जलसंधारण कामे करण्यासाठी बीजेएसच्या जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध होणार आहेत. या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये वैयक्तिक व सामूहिक अशी विविध कामे करण्यासाठीदेखील ग्रामपंचायती त्यांच्या निधीतून किंवा लोकवर्गणी काढून मशीन मागवू शकतात. यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील देखील या मशीनचा वापर करून शेताजवळील नाले साफसफाई करून खोलीकरण आणि शेतात नवीन शेततळी तयार करण्यासाठी संधी आहे. जलसंधारणाची कामे करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना मशीन हवी असेल त्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीकडे नावे द्यावीत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भारतीय जैन संघटनेकडून मोफत मशीन पुरवण्यात येईल. याकरीता मशीनला लागणारे इंधन व मशीन आॅपरेटरचे मानधन याचा खर्च त्या त्या ग्रामपंचायती अथवा शेतकºयांना करायचा आहे.ग्रामपंचायतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)