आॅनलाइन शॉपिंगमध्ये फसवेगिरी!

By Admin | Updated: April 10, 2017 00:39 IST2017-04-10T00:39:53+5:302017-04-10T00:39:53+5:30

आमिष दाखविणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहण्याची गरज

Fraud in online shopping! | आॅनलाइन शॉपिंगमध्ये फसवेगिरी!

आॅनलाइन शॉपिंगमध्ये फसवेगिरी!

नितीन निमकर्डे - खामगाव
आॅनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे आॅनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनी आपले व्यवहार सांभाळून करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
आधुनिक काळात आॅनलाइन शॉपिंगकडे नागरिकांचा कल वाढला असून अनेक जण अशी शॉपिंग करताना दिसतात. इंटरनेटवर झळकणाऱ्या आॅनलाइन जाहिराती पाहून अनेकांना खरेदीचा मोह आवरला जात नाही. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, मोबाइल आदींच्या या जाहिराती एकदम आकर्षक असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सूट व खरेदीवर सवलती जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला अनेक जण बळी पडतात. विशेषत: तरुण वर्ग कपडे, मोबाइलच्या जाहिराती पाहून आॅनलाइन बुकिंग करताना, आॅर्डर देताना दिसून येतात. परंतु पोस्टाने पॅक केलेले पार्सल आल्यानंतर व ते पैसे भरुन सोडवून घेतल्यानंतर त्यात मागविलेल्या वस्तूऐवजी लोखंडी किंवा स्टिलच्या पट्ट्या अथवा भुसा असे भलतेच काही निघत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. पार्सल सोडवून घेतल्यानंतर त्यात काय निघते याची जबाबदारी पोस्ट आॅफिसही घेऊ शकत नाही. बरेचदा पोस्टमनकडून असा सावधगिरीचा इशारा संबंधितांना दिलाही जातो; परंतु कोणी ऐकतो तर कोणी ऐकत नाही. मागवलेली वस्तू पार्सलमध्ये मिळाली तर उत्तमच पण कमी गुणवत्तेची वस्तू मिळाली किंवा फसवणूक झाली, तर त्याविरुद्ध तक्रार करणेही जिकरीचे काम होऊन जाते. संबंधित कंपनी आपले नाव व पत्ता कधीच स्पष्टपणे नमूद करीत नाही. याकरिता खोटी नावेच वापरली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन बसते. एवढ्या भानगडी केल्यापेक्षा गप्प बसणेच अनेक जण पसंत करतात. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या अशा भामट्यांचे फावत असून, त्यांचा हा गोरखधंदा वाढतच चालला आहे.

Web Title: Fraud in online shopping!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.