दागिने चकाकून देण्याच्या बहाण्याने चाेरट्यांनी वृद्धेला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST2021-09-12T04:40:06+5:302021-09-12T04:40:06+5:30
देशपांडे लेआउटमधील शीला धर्मपाल इंगळे (५५) या दुपारी घरी एकट्याच असताना त्यांच्या घरी दोन अनोळखी तरुण आले. ‘आम्ही तुमचे ...

दागिने चकाकून देण्याच्या बहाण्याने चाेरट्यांनी वृद्धेला लुबाडले
देशपांडे लेआउटमधील शीला धर्मपाल इंगळे (५५) या दुपारी घरी एकट्याच असताना त्यांच्या घरी दोन अनोळखी तरुण आले. ‘आम्ही तुमचे सोन्याचे व चांदीचे दागिने चकाकून देतो, आमच्याकडे दागिने चकाकून देण्याची पावडर आहे,’ असे म्हणत त्यांनी घरात प्रवेश केला. या आमिषाला शीला इंगळे या बळी पडल्या. त्यांनी भामट्यांना दागिने दिले. त्यानंतर अनोळखी तरुणांनी त्यांना कुकर आणायला सांगितले. कुकरमध्ये त्यांनी त्यांच्याकडील पावडर टाकली. इंगळे यांचे दागिने घेऊन ते कुकरमध्ये टाकल्याचे त्यांना सांगितले. कुकर ५ मिनिटांसाठी गॅसवर ठेवायला सांगितले. इंगळे कुकर घेऊन किचनमध्ये गेल्या आणि कुकर गॅसवर ठेवल्यानंतर त्या बाहेर आल्या तेव्हा दोन्ही तरुण पसार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी कुकर उघडून पाहिला असता कुकरमध्ये दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली तेव्हा शेजारी धावून आले. मात्र, तोपर्यंत चाेरटे पसार झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बुलडाणेकरांनो सावधान, तुमचीही होऊ शकते फसवणूक
बुलडाणा शहरात बाहेरील राज्यांतील किंवा इतर जिल्ह्यांतील भामट्याचा वावर वाढत आहे. हे भामटे आधी काही परिसरांची रेकी करून नंतर चोरी किंवा फसवणूक होईल त्या घरात प्रवेश करून वृद्ध महिलांना हेरून त्यांच्याकडील दागिने लंपास करीत आहेत. तेव्हा अनोळखी व्यक्तींच्या कुठल्याच आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन बुलडाणा पोलिसांनी केले आहे.
घटना घडली दुपारी, रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची प्रक्रिया सुरू
शहरातील देशपांडे लेआउटमध्ये दुपारी एक वाजता घडलेल्या लुबाडणुकीच्या घटनेची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरलेली असताना शहर पोलीस ठाण्यात मात्र याप्रकरणी फिर्यादीकडून रात्री उशिरापर्यंत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.