Four Panchayt samiti's post of Chairman is reserved for SC, ST | चार पं. स. सभापती पदे एससी, एसटीसाठी राखीव
चार पं. स. सभापती पदे एससी, एसटीसाठी राखीव

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण गुरूवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये खामगाव लोणार पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण हे अनुसुचित जाती (स्त्री) तर चिखली आणि देऊळगाव राजा येथील आरक्षण हे अनुक्रमे अनुसुचीत जाती व जमाती प्रवर्गासाठी निघाले आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गुरूवारी ही आरक्षण सोडत काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे हे यावेळी पिढासीन अधिकारी होते. दरम्यान, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, नायब तहसिलदार सुनील अहेर हे उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता या आरक्षण सोडतीच्या बैठकीस प्रारंभ झाला. २०११ च्या जनगनेनुसार उतरत्या क्रमाने तालुक्यांची लोकसंख्या विचारात घेऊन प्रथमत: एससी, एसटीची जेथे लोकसंख्या अधिक आहे तेथील आरक्षण काढण्यात आले. यामध्ये खामगाव आणि लोणार पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण हे अनुसुचित जाती (स्त्री) प्रवर्गासाठी निघाले. त्यानंतर चिखलीचे आरक्षण हे अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी निघाले.
त्यानंतर ईश्वर चिठ्ठीने मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जामोद आणि नांदुऱ्याचे आरक्षण काढण्यात आले. मलकापूर आणि संग्रामपूरचे आरक्षण हे ओबीसी (स्त्री) तर जळगाव जामोद व नांदुºयाचे सभापतीपदाचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी निघाले. दरम्यान, बुलडाणा, शेगाव, सिंदखेड राजा या पंचायत समिती सभापतींचे आरक्षण हे सर्वसाधारण (स्त्री) प्रवर्गासाठी तर मेहकर आणि मोताळा पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले आहे.
जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी अनुसूचित जाती प्रवगार्साठी दोन पैकी एक महिलेसाठी आरक्षीत आहे. नागरिकांचा मागास प्रवगार्साठी एकूण चार पैकी दोन महिलांसाठी तर सर्वसाधारणसाठी एकूण पाच पैकी ३ महिलांसाठी आरक्षण असणार आहे. दरम्यान, या आरक्षण निश्चितीसाठी २०१७ पर्र्यंत पडलेल्या आरक्षणाचा विचार करण्यात आला आहे. लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने तालुके विचारात घेवून आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण काढतेवेळी लिपिक राम जाधव संबंधित पंचायत समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीच्या आदेशाची प्रतीक्षा
राज्यातील नगर, बुलडाणा जिल्हा वगळता अन्य काही जिल्ह्यात अद्याप पंचायत समिती सभापती आरक्षणाची सोडत निघालेली नाही. निवडणूक विभागास प्राप्त कार्यक्रमानुसार बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचायत समिती सभापती आरक्षण पदाची सोडत काढली. आता ग्रामविकास विभाग आणि निवडणूक विभागाच्या समन्वयातू २० डिसेंबर नंतर सभापतीपदासाठी आरक्षण सोडत घेण्याच्या संदर्भात निर्देश येण्याची शक्यता आहे. या निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होईल.

चार पं. स.चे ईश्वर चिठ्ठीने सभापती
१३ पैकी चार पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण हे ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आले. ११ वर्षीय सुदर्शन गजानन सनिसे या मुलाला वेळेवर बोलावून टाकण्यात आलेल्या चिठ्ठ्यामधून हे आरक्षण काढण्यात आले आहे. मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जामोद आणि नांदुरा या पंचायत समित्यांचा यात समावेश होता.

 

 

Web Title: Four Panchayt samiti's post of Chairman is reserved for SC, ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.