बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 19:39 IST2020-06-06T19:38:56+5:302020-06-06T19:39:04+5:30
हुसकावून लावण्याच्या नागरिकांच्या प्रयत्नानंतर बिथरलेल्या बिबट्याने चौघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी
जानेफळ/नायगाव दत्तापूर : मेहकर तालुक्यातील मोळा गावानजीक आलेल्या बिबट्याला हुसकावून लावण्याच्या नागरिकांच्या प्रयत्नानंतर बिथरलेल्या बिबट्याने चौघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. ही घटना सहा जून रोजी सायंकाळी सहा वाजे्च्या सुमारास घडली. दरम्यान, जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
शनिवारी सायंकाळी मोळी शेत शिवारातून मोळा गावानजीक असलेल्या नाल्यात बिबट्या उतरल्याचे पाहून शेतात काम करणाºया महिला व नागरिकांनी एकच आरडाओरड केली. त्यामुळे गावातील युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने मोळा-मोळी या दोन गावाच्या दरम्यानच्या नाल्याच्या दिशेने धाव घेतली.
नागरिकांची आरडाओरड व धावत येणारे नागरिक पाहता बिबट्या बिथरला व त्याने समोर दिसेल त्याच्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली. यामध्ये गर्दीतील निखील धोटे, मधुकर वानखेडे, दत्ता वानखेडे आणि गिताबाई कड (सर्व रा मोळी) जखमी झाल्या आहेत. यातील निखिल धोटे हा १३ वर्षाचा मुलगा आहे. सर्व जखमींना उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली असून वृत्त लिहीपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. राजू रहाटे यानी वनपाल एस. वाय. बोबडे यांना या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवर कळवली आहे.
शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण
मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे सध्या सर्वत्र शेतातील मशागतीचे कामे जोमात सुरू आहेत. काडी कचरा वेचण्यापासून वखर पाळीही देण्यात येत आहे. त्यामुळे शेतात मजूर व शेतकºयांची गर्दी झाली आहे. मात्र आता बिबट्याच्या या परिसरातील वावरामुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.