वृक्षतोड करणा-यांवर वनविभागाचा छापा
By Admin | Updated: March 18, 2015 23:40 IST2015-03-18T23:40:31+5:302015-03-18T23:40:31+5:30
नऊ जणांविरुद्ध गुन्हा; साहित्य जप्त.

वृक्षतोड करणा-यांवर वनविभागाचा छापा
खामगाव (जि. बुलडाणा) : विनापरवाना वृक्षांची कत्तल करणार्या टोळीवर येथील वनविभागाच्या पथकाने छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले. ही घटना तालुक्यातील झोडगा येथे १७ मार्च रोजी दुपारी घडली. येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दहिवाल यांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या फिरत्या पथकाने हा छापा टाकला. वनविभागाचे पथक गणेशपूर, वझर आणि झोडगा या ठिकाणी १७ मार्च रोजी दुपारी गस्त घालत असताना त्यांना झोडगा शिवारात काही इसम सागवन, धावडा, मोई आणि सावळा या वृक्षांची अवैधपणे कत्तल करताना दिसून आले. यावेळी वनकर्मचार्यांनी छापा टाकून भाई सुभाष वाकोडे, भीमराव गावंडे, ज्योत्सना रणित रा.वझर, शे.कदीर शे. मजिद, शे. रज्जाक शे. इरफान, शे. रशीद, जयदाबी शे. रशीद रा. झोडगा, विकास घड्याळे व पुरुषोत्तम घड्याळे रा.नागझरी यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याजवळून दोन कुर्हाडी व २४ हजारांची कत्तल केलेली झाडे जप्त केली. याप्रकरणी या नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.