अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक
By Admin | Updated: May 18, 2017 14:27 IST2017-05-18T14:27:59+5:302017-05-18T14:27:59+5:30
चिखली ते टाकरखेड मुसलमान रस्त्यावर गुरूवारी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक
अमडापूर (चिखली) : चिखली ते टाकरखेड मुसलमान रस्त्यावर गुरूवारी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांना बोलाविले. मात्र पोलिसांना यायला उशीर झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. चिखली टाकरखेड मुसलमान रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने टाकरखेड मुसलमान येथील दिलीप गायकवाड यांना धडक दिली. यामध्ये गायकवाड यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यानंतर येथे गावातील लोक जमा झाले व त्यांनी अमडापूर पोलिसांना बोलाविले. मात्र, पोलिस तब्बल एक तास उशीरा आल्यामुळे गावकरी संतापले व त्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. अखेरीस पोलिस उपविभागीय अधिकारी महामुनी यांनी घटनास्थळावर जावून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी ठाणेदार भुषण गावंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. महामुनी यांनी गावंडे यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर गावकरी शांत झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.