अखेर भारतीय खाद्य निगमच्या गोदामावरील भुईकाटा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 17:45 IST2020-06-03T17:45:32+5:302020-06-03T17:45:38+5:30
एफसीआय अधिकाºयांनी गोदामावरील भुईकाटा बंद करून खासगी भुईकाट्यावरून गोरगरीबांसाठी भरून जाणाºया धान्याचे वजन करण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागितली आहे.

अखेर भारतीय खाद्य निगमच्या गोदामावरील भुईकाटा बंद!
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय)च्या इलेक्ट्रानिक भुई काट्यातील फेरफार प्रकरणाचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केला. त्यानंतर अडचणीत सापडलेल्या एफसीआय अधिकाºयांनी गोदामावरील भुईकाटा बंद करून खासगी भुईकाट्यावरून गोरगरीबांसाठी भरून जाणाºया धान्याचे वजन करण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागितली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारतीय खाद्य निगमच्या टेंभूर्णा येथील गोदामावरील भुईकाट्यात ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक कंपनीने फेरफार केली. भुई काट्याचे इंडिकेटर विनापरवानगी बदलविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतीय वैद्यमापन विभागाने काटा जप्त केला. त्यानंतर संबंधितांना २८ हजाराचा दंड ठोठावला. काट्यावर अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्याने या काट्याचे प्रमाणिकरण विलंबाने करण्यात आले. दरम्यान, प्रमाणीकरण झाल्यानंतरही भुई काट्यावरील वजन आणि शहरातील इतर खासगी काट्यावरील वजनात तफावत आढळून आल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर भारतीय खाद्य निगमच्या साठा अधिक्षकांनी मंडळ प्रंबधकांना पत्र देत, खासगी भुईकाट्यावरून जावक परवानगी देण्याची मागणी केली आहे.
साठा अधिक्षकांच्या पत्रातील कारण संशयास्पद!
एफसीआयचे साठा अधिक्षक बी.एफ.भवर यांनी मंडळ प्रबंधकांना दिलेल्या पत्रात ३१ मे २०२० रोजी वादळी वारे तसेच वीज चमकणे आणि पावसामुळे वजन काट्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, तत्पूर्वी म्हणजेच ३० मे रोजी‘प्रमाणीकरणानंतरही एफसीआयच्या भुई काट्यातील ‘तूट’ कायम’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत करून काट्यावरील पोलखोल उघडकीस आणली होती. त्यानंतर साठा अधिक्षकांकडून पत्र देत, वरिष्ठांची दिशाभूल करण्यात आली. परिणामी, वजन काट्यातील फेरफार प्रकरणात एफसीआयचे स्थानिक अधिकारी तर सहभागी नाही ना? अशी जोरदार चर्चा आहे.
धान्याची रॅक संपल्यानंतर काटा खराब!
भारतीय खाद्य निगमकडून रेल्वेद्वारे (रॅकने) धान्य पाठविण्यात येते. खामगाव येथील धान्याची रॅक संपल्यानंतरच गोदामावरील काटा खराब झाल्याने, गोदाम व्यवस्थापन आणि ब्लॅक स्टोन व्यवस्थापनावर संशयाची सुई बळावत असल्याची जोरदार चर्चा आहे.