जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट गडद!
By Admin | Updated: April 12, 2017 00:48 IST2017-04-12T00:48:03+5:302017-04-12T00:48:03+5:30
खामगाव- चाऱ्याचे भाव गगणाला भिडले असून, जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट गडद!
पशुपालक हैराण: ज्वारी, मका उत्पादनाच्या पेऱ्यात घट
अनिल गवई - खामगाव
जिल्ह्यात ज्वारी, मका आणि चारावर्गीय पिकाच्या पेऱ्यात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून, चाऱ्याचे भाव गगणाला भिडले असून, जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चाऱ्याचे भाव चारपटीने वधारल्याने, ग्रामीण भागात चारा चोरी जाण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
परिसरात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाला, तर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी, पावसाच्या लहरीपणामुळे ज्वारी, मका पिकासोबतच इतर चारावर्गीय पिकांच्या पेऱ्यात कमालिची घट झाली. परिणामी, जमिनीतील पाणी पातळी खोल जात असतानाच अनेक भागातील पिकांनाही फटका बसला आहे. चारा वर्गीय पिकांना सातत्याने कधी जास्त, कधी अत्यल्प तर कधी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर शेती पिकाचे उत्पादन घटल्याने, तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीस काढली आहे; मात्र या जनावरांना योग्य भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून उपाय योजना करावी, अशी मागणी विविध परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
गोधन विक्रीकडे अनेकांचा कल!
जिल्ह्यात निर्माण झालेल्या चारा आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा सांभाळ करणे कठीण झालेल्या पशू पालकांनी आपला मोर्चा गोधन आणि जनावरे विक्रीचा पर्याय निवडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात जनावरांच्या विक्रीत वाढ झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे गोपालकांना शासनाकडून सहकार्य करण्याची मागणी जोर धरत आहे.
कडब्याच्या पेडींचे दर वधारले!
महिना भरापूर्वी ज्वारीच्या कडब्याची एक पेंडी १८-२० रुपयांना मिळत होती. त्यानंतर दिवाळीच्या वेळी हीच पेंडी २२-२५ रुपयांवर पोहोचली; मात्र आता चाराच शिल्लक नसल्यामुळे २८-३० रुपयांपर्यंत या पेंडीचे दर पोहोचले आहेत. त्यामुळे चारा खरेदी करताना, शेतकरी तसेच जनावरे पालक चांगलेच मेटाकुटीस येत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
बागायतदार शेतकऱ्यांनाही फटका!
बागायतदार शेतकऱ्यांनी चारा वर्गीय पिकांची लागवड करण्याचा प्रयत्न करीत, चारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र जमिनीतील पाणी पातळी खोल गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची ही पिकं शेतातच करपली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात चारा टंचाई ही तीव्र समस्या बनली आहे. खामगाव, मलकापूर, चिखली, सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने चाऱ्याची टंचाई भासत आहे.
पाणी टंचाईचाही प्रश्न ऐरणीवर!
चारा टंचाईसोबतच जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बाया-बापड्यांना संघर्ष करावा लागत असताना, जनावरांसाठी पाणी आणावे तरी कोठून? असा प्रश्न जिल्ह्यातील पशुपालकांना पडला आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
चारा चोरीच्या घटनांमध्ये वाढ!
चारा टंचाईमुळे ग्रामीण भागामध्ये चाऱ्याला ‘सोन्याचे भाव’ आले असून, काही ठिकाणी चारा चोरीच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत.
चारा वर्गीय पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाऱ्याच्या भावातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जनावरांची देखभाल करणे जिकरीचे होत आहे.
- संतोष गव्हाळे, सधन कास्तकार,रोहणा ता. खामगाव