सोन्याचे आमिष दाखवून पाच लाखाचा गंडा, आरोपी अटकेत
By Admin | Updated: September 8, 2015 02:18 IST2015-09-08T02:18:22+5:302015-09-08T02:18:22+5:30
मुख्य आरोपीसह दोन जणांना अटक, ६ लाख २७ हजाराचा ऐवज जप्त; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती.

सोन्याचे आमिष दाखवून पाच लाखाचा गंडा, आरोपी अटकेत
मेहकर (जि. बुलडाणा): दोन किलो सोने देतो, असे म्हणून एका जणाला ५ लाख २0 हजार रुपयांनी लुटल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी मेहकर डोणगाव रोडवर घडली होती. यात मुख्य आरोपीसह दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख २७ हजाराचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाविस्कर यांनी ७ सप्टेंबर रोजी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार परिषदेत दिली. साजन अशोक वाघेला (२३) रा. विक्रोळी मुंबई यांना कमी किमतीमध्ये सोने देतो, असे सांगून कृष्णा व नंदू यांनी मेहकर येथे बोलाविले होते. दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी साजन वाघेला हे मेहकर येथे ५ लाख रुपये घेऊन आले असता कृष्णा व नंदू आणि ७ ते ८ इसमांनी साजन वाघेला यांना काठीने मारहाण करुन व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाइल असा एकूण ५ लाख २0 हजार रुपयाचा ऐवज घेऊन स्कार्पिओ गाडीने डोणगावकडे पलायन केले. यासंदर्भात साजन वाघेला यांच्या फिर्यादीवरुन मेहकर पोलिसात कृष्णा व नंदू आणि ७ ते ८ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात तत्काळ नाकाबंदी करण्यात आली. सुहेल शर्मा यांच्यासह ठाणेदार एम.डी.राठोड व पोलीस पथक हे घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, डोणगावचे सपोनि सचिन पाटील, पोकॉ वाघ, बावणे, गव्हाळे, होमगार्ड मळेकर, पठाण, वाहनचालक डोईफोडे हे गोहोगाव फाट्यावर नाकाबंदी करीत असताना एक स्कार्पिओ गाडी न थांबता मालेगावकडे गेली. तेव्हा मालेगावचे पोनि. मिर्झा यांना सदर घटनेची माहिती दिली असता, मालेगाव येथे पोलिसांनी नाकाबंदी करुन एम.एच.२९ ए.डी.३४६७ क्रमांकाची गाडी व वाहनचालक आरोपी देवानंद देवराव जिरे रा.दिघी ह.मु.कारंजा यास ताब्यात घेतले. आरोपी देवानंद जिरे यास विचारपूस केली, यावरुन वाशिम पोलीसांनी येथे सापळा रचून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विठ्ठल पांडुरंग पवार रा.पिंपळगाव पारध ता. पुसद यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ लाख रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात देवानंद देवराव जिरे रा.दिघी ह.मु.कारंजा व मुख्य आरोपी विठ्ठल पांडुरंग पवार रा.पिंपळगाव पारध ता.पुसद या दोन जणांना अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम १ लाख १८ हजार रुपये, फिर्यादीचा मोबाइल, स्कार्पिओ गाडी, आरोपींचे तीन मोबाइल, असा एकूण ६ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त केला.