पाच कर्मचारी आठ दिवसांसाठी निलंबित!

By Admin | Updated: May 4, 2017 00:38 IST2017-05-04T00:38:52+5:302017-05-04T00:38:52+5:30

खामगाव : येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावरील टोकन वाटप घोटाळाप्रकरणी कृउबासने पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Five employees suspended for eight days! | पाच कर्मचारी आठ दिवसांसाठी निलंबित!

पाच कर्मचारी आठ दिवसांसाठी निलंबित!

कृउबासची कारवाई : टोकन वाटपात घोळ

खामगाव : येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावरील टोकन वाटप घोटाळाप्रकरणी कृउबासने पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खामगाव येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर टोकन वाटपाच्या घोळावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
येथील टीएमसी यार्डात सुरू असलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर कृउबासमार्फत टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या टोकन वाटपात कृउबासकडून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा तसेच व्यापाऱ्यांचा माल विकल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्याकडे आल्या होत्या. १५ एप्रिल ही तूर खरेदीची शेवटची तारीख ठरविण्यात आली होती. यादिवशी नाफेड केंद्रावर कृउबास अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळताच आ.अ‍ॅड. फुंडकर यांनी खरेदी केंद्रावर जाऊन त्यांचा हा डाव उधळून लावला होता. तसेच टोकन वाटपातील घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर उपनिबंधकांच्या चौकशीत कृउबासच्या टोकन वाटपाच्या रजिस्टरमध्ये घोळ आढळून आला. ताब्यात घेण्यात आलेल्या या रजिस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर खाडाखोड असून, शेतकऱ्यांच्या नावाचा उल्लेख न करता ट्रॉली नंबर, ट्रॅक्टर नंबरच्या नोंदी घेऊन बऱ्याच ठिकाणी रिकाम्या जागा सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
तसेच सदर रजिस्टर सभापती संतोष टाले यांच्या कस्टडीत असल्याचा लेखी जबाब सचिव दिलीप देशमुख यांनी दिला होता.

सहायक निबंधकांच्या निर्देशावरून कारवाई
कृषी उत्पन्न बाजार समितीने नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर केलेल्या टोकन वाटप घोळप्रकरणी, सहायक निबंधक खामगाव यांनी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश कृउबासला दिले. त्यानुसार कृउबासने कारवाई करत कृउबासचे स्थायी कर्मचारी ग.वा. वाघे यांच्यासह रोजंदारी कर्मचारी सु.अ. खंडारे, म.भ. राजपूत, म.ना. खंडेराव व अ.प्र. खंडारे या पाच जणांवर आठ दिवस निलंबनाची कारवाई केली आहे.

आ.अ‍ॅड. आकाश फुंडकरांनी नाफेड खरेदी केंद्रावरील टोकन वाटप घोटाळा उघडकीस आणल्यानंतर कृउबासचे सभापती संतोष टाले यांनी टोकन वाटपात कुठलाच गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा केला होता. तसेच आ.फुंडकर हे प्रसिद्धीसाठी कृउबासला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत टाले यांनी स्वत:च स्वत:चा आरोप व दावा फोल ठरविला आहे.
- संजय शिनगारे, शहर अध्यक्ष, भाजप, खामगाव.

Web Title: Five employees suspended for eight days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.