मत्स्य व्यवसाय सापडला संकटात

By Admin | Updated: July 15, 2015 01:19 IST2015-07-15T01:19:41+5:302015-07-15T01:19:41+5:30

अपु-या पावसामुळे मत्स्यबीजांना धोका

Fishery found business in the crisis | मत्स्य व्यवसाय सापडला संकटात

मत्स्य व्यवसाय सापडला संकटात

नीलेश शहाकार / बुलडाणा : पावसाने दडी मारल्यानंतर जिल्ह्यात असलेल्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा न वाढल्याने मत्स्य व्यवसाय संकटात सापडला आहे. जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी ४२४ तळे, सरोवरे व जलाशये उपलब्ध आहेत. या अंतर्गत मत्स्य व्यवसायासाठी ७ हजार ७८७.६ हेक्टर जलक्षेत्र आहे; मात्र बर्‍याच जलाशयाला कोरड पडल्याने मत्स्य व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. अपुर्‍या पावसामुळे मस्त्यबीज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाची मोठी क्षमता आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात तळे, सरोवर व नद्यांतील पाण्यामुळे मत्स्य उत्पादनाचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे. पारंपरिक मच्छीमारांना नियमित व योग्य मोबदला मिळावा, यासाठी सहकारी तत्त्वावर जिल्ह्यात १६६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था स्थापन केल्या. या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने आखले होते. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पनाचा हा व्यवसाय पुर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास यंत्रणा, यांच्याकडून २४९.६९ लाख मस्त्यबीज वाटप करण्याचे नियोजन मत्स्योत्पादक शेतकर्‍यांना वाटप करण्याचे नियोजन आखण्यात आले; मात्र जुलै महिना आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे बरेच मत्स्योत्पादक जलाशय कोरडे आहे. त्यामुळे मत्स्यबीज न सोडण्यात आल्याने मत्स्योत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. मत्स्यबीज खराब झाल्याने आर्थिक फटका मत्स्य व्यवसाय वाढविणे व त्याची विक्री करणे या माध्यमातून जिल्ह्यात १६६ मत्स्यबीज व्यवसाय सहकारी संस्था कार्य करतात. या संस्थांना इतर राज्यातून मत्स्यबीज बोलवावे लागते; मात्र बर्‍याच ठिकाणचे अंतर अत्यंत दूर असल्याने मत्स्यबीज अनेकवेळा मार्गातच मृतावस्थेत आल्याने मोठा आर्थिक फटका बसतो. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर या संस्थांना भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या धरणात व तलावात मच्छीमार मत्स्यबीज सोडतात. ४ ते ५ महिन्यानंतर त्याची पुरेशी वाढ झाल्यावर त्याची विक्री करण्यात येते; मात्र यावेळी पावसाने दगा दिल्याने अद्याप मत्स्यबीजच बोलावले नसल्याची माहिती आहे.

Web Title: Fishery found business in the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.