कृषी साहित्याच्या गोदामाला आग, लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:58+5:302021-09-12T04:39:58+5:30
शहरातील दिलीप चौधरी यांच्या मालकीचे हे कृषी साहित्य व इलेक्ट्रिक बाइकचे दुकान आहे. शनिवारी पाहटे ३ वाजेच्या सुमारास दुकानामागील ...

कृषी साहित्याच्या गोदामाला आग, लाखो रुपयांचे नुकसान
शहरातील दिलीप चौधरी यांच्या मालकीचे हे कृषी साहित्य व इलेक्ट्रिक बाइकचे दुकान आहे. शनिवारी पाहटे ३ वाजेच्या सुमारास दुकानामागील गोडाऊनला ही भीषण आग लागली. त्यात गोडावूनमधील ठिबक, तुषार संच, पाइप, विविध कृषी साधने तसेच इलेक्ट्रिकल दुचाकींचा साठा ठेवलेला होता. दरम्यान, या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात चौधरी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीची माहिती गस्तीवर असलेल्या गोरखाला मिळाल्यानंतर त्यांनी नागरिकांना त्याची कल्पना दिली. सोबतच दिलीप चौधरी हेही त्यामुळे घटनास्थळी दाखल झाले. चार खासगी पाण्याच्या टँकरद्वारे ही आग विझविण्याचा प्रयत्न झाला. जालना येथूनही अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले; पण सकाळी ५ वाजता जालना येथून ते येईस्तोवर मोठे आर्थिक नुकसान होऊन साहित्य जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सुनील सावंत, पोलीस निरीक्षक केशव वाघ, नियोजन मंडळाचे सदस्य ॲड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, विष्णू मेहेत्रे यांनी घटनास्थळाची पाहणीही केली.
--आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी--
शहरात आगीच्या घटना तशा तुरळकच; परंतु पालिका असल्याने अग्निशामक यंत्रणा येथे उपलब्ध आहे; परंतु ही सुविधा असतानाही जालना येथून अग्निशामकची गाडी बोलविण्यात आली. दोन वर्षांपासून सिंदखेड राजा येथे अग्निशामक यंत्रणा येथे उपलब्ध असतानाही जालन्यावर गाडी का बोलविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जवळपास दोन वर्षांपासून पालिकेची अग्निशामक यंत्रणा व वाहन उपलब्ध आहे. मात्र, त्यावर चालक आणि वाहकच नसल्याने अग्निशामक यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यी यंत्रणा कार्यान्वित असती, तर मोठे नुकसान टळले असते, असे भाजपचे नेते विष्णू मेहेत्रे यानी सांगितले. त्यामुळे या प्रकाराचे उत्तरदायित्व पालिकेने स्वीकारण्याची गरज आहे.
--समृद्धीच्या कार्यालयाचेही नुकसान--
ज्या गोडाऊनमधील हे साहित्य जळून खाक झाले. त्याच गोडाऊनच्या वर समृद्धी महामार्गाचेही कार्यालय आहे. आगीची झळ या कार्यालयास बसून त्याचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. मात्र, नेमके किती व काय नुकसान झाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही.