अभयारण्यात आग प्रतिबंधक यंत्रणा

By Admin | Updated: November 28, 2015 02:40 IST2015-11-28T02:40:12+5:302015-11-28T02:40:12+5:30

ज्ञानगंगामध्ये फायर लाइन, सात अग्निरक्षक पथके तैनात.

Fire prevention system in the park | अभयारण्यात आग प्रतिबंधक यंत्रणा

अभयारण्यात आग प्रतिबंधक यंत्रणा

नीलेश जोशी /खामगाव : दुर्मीळ औषधी वनस्पतींसह वन्य जिवांची भरमार असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याला दरवर्षी लागणार्‍या आगीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने अग्निप्रतिबंधक यंत्रणा नोव्हेंबरपासून कार्यान्वित झाली आहे. दरम्यान, बुलडाणा-खामगाव या अभयारण्यातून जाणार्‍या २६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा कंट्रोल बर्निंंंग करण्यासाठी यंत्रणेने सध्या पावले टाकली आहेत. दोन वनपरीक्षेत्रात तथा चार तालुक्यांचा २0५.२१ चौरस किमी भाग व्यापलेल्या या अभयारण्याची गेल्या दोन ते तीन वर्षात नोव्हेंबर ते जूनदरम्यान लागलेल्या जवळपास सात आगीमुळे मोठी हानी झाली होती. येथील जैवविविधतेलाही त्याचा फटका बसला होता. त्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाने १८ नोव्हेंबरपासूनच जाळ रेषेचे काम येथे हाती घेतले आहे. सध्या जवळपास सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या एका बाजूकडील काम पूर्णत्वास केले असून, बुलडाणा-खामगाव मार्गापासून दहा मीटर अंतरावर जाळ रेषा निर्माण करण्यात आली आहे. यासाठी सध्या सात महिला रस्त्यालगतचे गवत कापत असून, लवकरच कंट्रोल बर्निंंंगला अभयारण्यात प्रारंभ करण्यात येणार असल्याचे वन्य जीव विभागाच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणार्‍या बुलडाणा-खामगाव मार्गाची दुतर्फा बाजून ही आगीच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने येथील जाळ रेषेचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले आहे. रस्त्यालगतच्या दहा मीटर परिसरातील दोन्ही बाजूला असलेले गवत व काडीकचरा नियंत्रित आग लावून अल्पावधीतच नष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने होणार्‍या वाहतुकीमुळे किंवा वाटसरूच्या अनावधानाने अभयारण्यास लागणारी आग रोखण्यास मदत मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Fire prevention system in the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.