विष्णुवाडीत शॉर्ट सर्किटमुळे आग; १७ लाखांचे साहित्य खाक
By Admin | Updated: April 20, 2017 23:28 IST2017-04-20T23:28:32+5:302017-04-20T23:28:32+5:30
बुलडाणा : शहरातीलच विष्णुवाडी येथील बाळकृष्ण नारखेडे यांच्या घराला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून १७ लाखांचे नुकसान झाले आहे.

विष्णुवाडीत शॉर्ट सर्किटमुळे आग; १७ लाखांचे साहित्य खाक
बुलडाणा : शहरातीलच विष्णुवाडी येथील बाळकृष्ण नारखेडे यांच्या घराला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून १७ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेत जीवित हानी झाली नाही. रात्री किचनमध्ये आगीचे लोळ उठत असल्याने वरच्या मजल्यावर गाढ झोपेत असलेल्या कुटुंबीयांची एकच तारांबळ उडाली. बाळू नारखेडे यांनी आरडाओरड केल्याने शेजारी झोपेतून उठले व काहींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहचल्याने आग आटोक्यात आली. यात जीवित हानी झाली नसली, तरी नारखेडे यांच्या घरातील जवळपास महत्त्वाचे सर्व सामान जळून खाक झाले आहे. विष्णुवाडी स्थित बाळकृष्ण नारखेडे यांचे घर आहे. रात्रीचे जेवण आटोपून नारखेडे कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपी गेले. मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांनी नारखेडे यांच्या पत्नी मनीषा यांना अचानक जाग आली. तसेच घरामध्ये धूर जमा झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी उठून पाहिले असता किचनमध्ये आगीचे लोळ उटत होते. याची माहिती त्यांनी मोबाइलवरून पती बाळकृष्ण नारखेडे यांना दिली. तसेच आरडाओरड करुन शेजाऱ्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. वरच्या मजल्यावर झोपलेले बाळू नारखेडे यांनी मागच्या दरवाज्याने प्रवेश केला व सर्व कुटुंबीयांना बाहेर काढले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन तसेच अग्निशमक दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस व अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत शेजाऱ्यांनी बोअर व नळ चालू करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत घरातील टिव्ही, फ्रिज, पंखे, एसी, डीव्हीडी प्लेयर, फर्निचर आगीच्या भक्षस्थानी पडले होते. या घटनेची माहिती शहरभर पसरल्याने शिवसेना नेते संजय गायकवाड, बद्रीसेठ पंजाबी, डॉ. काळे, शिक्षक इंगळे, पिंपरकर, लढ्ढा, जाधव यांनी मदतीसाठी प्रयत्न केले.
आग लागल्याने सहा बकऱ्या ठार
हिवरा आश्रम : येथून जवळच असलेल्या कळंबेश्वर येथे गोठ्यांना अचानक आग लागली. या आगीमध्ये सहा बकऱ्या ठार, तर अन्नधान्याचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. कळंबेश्वर येथील शेख नजीर शेख करीम व श्रीराम जुमडे यांचे गोठे गावाला लागूनच आहे. दुपारी अचानक आग लागल्याने शेख नजीर शेख करीम यांच्या बकऱ्या ठार झाल्या, तर जुमडे यांचे तूर, गहू, ज्वारी व इतर साहित्याचे नुकसान झाले. घटनेची माहिती कळताच आ.डॉ. संजय रायमुलकर, जि.प. सदस्य आशिष रहाटे, तहसीलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, घटनास्थळी उपस्थित होते.