जिल्ह्यात आगीचे तांडव!
By Admin | Updated: April 20, 2017 23:26 IST2017-04-20T23:26:22+5:302017-04-20T23:26:22+5:30
तांदूळवाडीत सात घरे खाक : तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचविले जनावरांचे प्राण

जिल्ह्यात आगीचे तांडव!
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील तांदूळवाडी येथे गुरुवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सात घरे व अनेकांचे गोठे जळून खाक झाले. यामध्ये किमान २० ते २५ लाखांचे नुकसान झाले.
जि.प. प्राथमिक शाळेसमोरील एका गोठ्याला दुपारी आग लागली. आगीची वार्ता गावात पसरताच काही धाडसी युवकांनी गोठ्यातील बैलांना सोडवून त्यांचे प्राण वाचविले. त्याचवेळी वारा सुटल्याने आगीने सात घरे व गोठे यांना कवेत घेतले. सरपंच बुंधे आणि शिवसेना विभागप्रमुख अनंता शेळके यांनी तातडीने पोलीस स्टेशन, चिखली नगरपालिकेचे अग्निशमन दल, मेहकरचे अग्निशमन दल यांच्याशी संपर्क साधला. गावातील युवकांनी बैलगाडीवर ड्रम टाकून मिळेल तेथून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु वाऱ्यामुळे आग फैलतच चालली होती. मनोहर एकनाथ बुंधे यांनी तातडीने स्प्रिंक्लरचे पाइप जोडून पाणी त्याठिकाणी पोहचविले. अवघ्या दोन तासांत गुलाब सुखदेव बुंधे, ईश्वर बुंधे, भागवत बुंधे, घनश्याम अंभोरे, सुधाकर अंभोरे, रमेश बुंधे, बबन बुंधे यांची घरे आणि गोठे जळाली. भागवत यांची थ्रेशर मशीनही जळाली. आगीचे तांडव एवढे भयानक होते, की पाणी टाकणाऱ्या यवुकांचे हात भाजले. पाणी वाहून आणणाऱ्या बैल गाडीने सुद्धा पेट घेतला होता. वेळीच लक्षात आल्याने बैलगाडी वाचली. सरपंच भुजंगराव बुंधे, माजी सरपंच मनोहर बुंधे, अरुण बुंधे, किरण बुंधे यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. यावेळी तहसीलदार संतोष कणसे, जि.प.चे सभापती दिनकरराव देशमुख, जि.प. सदस्य राम जाधव, शिवसेना नेते रवींद्र पाटील, पं.स. सदस्य बद्री बोडखे, सरपंच महेंद्र पाटील, बबन लोढे घटनास्थळी पोहचले. पटवारी, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, ग्रामसेवक यांनी पंचनामा करणे सुरू केले. आगीचे तांडव पाहून एका महिलेला भोवळ आली. तातडीने तिला रुग्णालयात हलविण्यात आले.