युवकाच्या आत्महत्या प्रकरणी पुणे येथील कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST2021-09-03T04:36:37+5:302021-09-03T04:36:37+5:30
मनोज राठोड (वय ३२, रा. पळसखेड काकर, जि. जळगाव) या युवकाने ६ ऑगस्ट रोजी धामणगाव बढे परिसरातील शिवारात विष ...

युवकाच्या आत्महत्या प्रकरणी पुणे येथील कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
मनोज राठोड (वय ३२, रा. पळसखेड काकर, जि. जळगाव) या युवकाने ६ ऑगस्ट रोजी धामणगाव बढे परिसरातील शिवारात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यावेळी धामणगाव बढे पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. २ सप्टेंबर रोजी याप्रकरणी विनोद महारु राठोड( वय ३८, रा. पळसखेड काकर) यांनी धामणगाव बढे पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अमोल विश्वनाथ सिंगनाथ (वय ३५, रा. उरळी कांचन, जि. पुणे) या एसआयएस कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीमध्ये संबंधित आरोपीने कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले नाही असे म्हणून जास्तीचे वीस हजार रुपये मागितले व तुला एक रुपया ही मिळू देणार नाही असे धमकावत नोकरीवरून कमी करण्याची धमकी दिल्याचा उल्लेख आहे. तसेच मृतक युवकाचा शारीरिक व मानसिक छळ झाल्यामुळे व समाजात बदनामीच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे . प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी त्या युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.