दोन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 2, 2015 02:47 IST2015-11-02T02:47:09+5:302015-11-02T02:47:09+5:30
सैलानी येथील घटना; तपासाला वेग, नातेवाइकांकडून घातपाताचा संशय.

दोन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा): अज्ञात तरुणाची हत्या करून त्याचे प्रेत पोत्यात बांधून सैलानीच्या जंगलात फेकून दिल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली होती. यातील मृतकाची ओळख पटली असून, तो लोणार तालुक्यातील हिरडव येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी विलास साहेबराव मुंढे रा. हिरडव यांच्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सैलानी परिसरात जंगलात पोत्यामध्ये बांधलेला ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह ३१ ऑक्टोबर रोजी आढळून आला होता. पोलिसांनी पंचनामा करतेवेळी त्याच्या खिशात हिरडव तालुका लोणार येथील मोहन मेडिकलची औषधीची चिठ्ठी आढळून आली होती. या चिठ्ठीच्या आधारे मोबाइल नंबरवरून पोलिसांनी औषधी दुकान मालकाशी संपर्क साधला व पोलिसांनी मृतकाच्या नातेवाइकाचा तपास लावला. मृतकाचे काका नंदकिशोर मुंढे यांच्याशी पोलिसांनी संपर्क करून मृतकाचे नाव व वर्णन सांगितल्यावरून प्रकाश मुंढे यांचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले. अशा प्रकारे मृतकाच्या खिशातील औषधीच्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन नातेवाइकांना ओळख पटवून दिली. पुढील तपास पोलीस अधीक्षक संजय बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भूषण गावंडे सहायक उपनिरीक्षक यशवंत तायडे, पोकाँ राजेश मानकर करीत आहेत. प्रकाश मुंढे यांनी आपल्या मुलाचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला. दे. राजाचे एसडीपीओ प्रशांत परदेशी यांनी सैलानी घटनास्थळाला भेट दिली.