मूर्ती लाखापर्यंत

By Admin | Updated: August 26, 2014 23:49 IST2014-08-26T22:22:26+5:302014-08-26T23:49:45+5:30

कारागिरांचे संपूर्ण कुटुंबीय आणि तीन हजारांपेक्षा जास्त कारागीर मूर्ती तयार करण्यासाठी गुंतले आहेत.

Figures are up to Rs | मूर्ती लाखापर्यंत

मूर्ती लाखापर्यंत

गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर सध्या बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. कारागिरांचे संपूर्ण कुटुंबीय आणि तीन हजारांपेक्षा जास्त कारागीर मूर्ती तयार करण्यासाठी गुंतले आहेत. शेगाव व खामगाव येथील मूर्तींना अन्य जिल्ह्यातूनही मागणी होत असते. यंदा १ ते ३0 फुटापर्यंत उंची असलेल्या विविध आकारातील आकर्षक मूर्ती खरेदीदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. ५00 रुपयांपासून ते ३५ ते ४0 हजार, शिवाय १ लाख रुपयांपर्यंत मूर्तींचे दर आहेत. घरगुती ग्राहकांचा छोट्या आणि आकर्षक मूर्ती खरेदीकडे जास्त कल आहे तर सार्वजनिक मंडळांकडून मोठमोठय़ा मूर्तींना मागणी आहे. यंदाचा गणपती सण महागाईच्या सावटाखाली येत आहे. गौरी-गणपती सणाच्या पृष्ठभूमीवर महागाईचा भस्मासुर वाढतच आहे. तसे असले तरी गरीबसुद्धा गणेशाची आराधना आनंदात करणार आहे, हे विशेष.

** कच्च्या मालाच्या किमतीत वाढ
शेगाव येथील मूर्तिकार संजय कोठोळे यांनी सांगितले की, वाढत्या महागाईमुळे कच्च्या मालांमध्ये मोठी भाववाढ झाली आहे. या वर्षी तणस, लाकूड आणि रंगाच्या किमती दुपटीवर गेल्या आहेत. माती इतर जिल्ह्यातील आणली जाते. साधारणत: एक गाडी माती ८ ते १0 हजार रुपयाला मिळते. रंग, जिप्सम यासह मूर्तीसाठी लागणार्‍या विविध वस्तूंना दिवसेंदिवस जास्त पैसे लागतात.. वाहतुकीचा खर्च आणि कारागिरांची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे यावर्षी मूर्तींच्या दरात वाढ झाली आहे. व्यवसायातील स्पर्धा आणि महागाईमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, असे मत राजेंद्र व धमेंद्र काठोळे या दोन्ही मूर्तिकारांनीही व्यक्त केले. उत्सवाच्या सहा महिन्यांआधीच तणस, माती, पोते, लाकूड असा कच्चा माल गोळा करण्याचे काम सुरू होते. मूर्तीला डिझाईन येण्याआधी वेगळी माती वापरली जाते. मातीत डिंक, कापूस टाकून मिश्रण तयार केले जाते. नवीन लोकांचा ओढा या कामात अतिशय कमी आहे. गणपतीबरोबरच गौरीची मूर्ती तयार करण्याचे कामही सुरू आहे. महालक्ष्मीच्या मुखवट्यांना जास्त मागणी असते.

** उत्सवाला झळाळी सोन्याची
पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पाला सजवण्यासाठी आता सराफा मंडळीही कामाला लागली आहेत. सोन्याच्या किमतीने २९ हजारांचा टप्पा ओलांडला असला तरीही यथाशक्ती सोन्याचे दागिने गणरायाला अर्पण करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. विविध प्रकारचे दागिने बाजारात मिळू लागल्याने गणेशोत्सवाला सोन्याची झळाळी असणार आहे. कुणी घरच्या गणपतीला हौसेने दागिना घालायचा म्हणून तर कुणी भक्तिभावापोटी दागिना अर्पण करण्यासाठी खरेदी करीत आहेत. एक ग्रॅमचा का असेना; पण बाप्पाला दागिना घालूच अशी त्याच्या भक्तांची धारणा असल्याने सोन्याचे भाव आणखी वाढण्यापूर्वी गणपतीसाठी मौल्यवान वस्तू खरेदी करून टाकावी याकडे ग्राहकांचा कल आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या वस्तूंना, विशेषत: पूजा साहित्याला जास्त मागणी आहे. त्याबरोबरीने चांदीचा उंदीर, दुर्वांचा हार आणि निरांजनांना या काळात खप असल्याचे सराफांनी सांगितले. एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचा सध्या ट्रेण्ड असल्याने ते दागिनेही गणेशभक्तांना आकृष्ट करीत आहेत. एकूणच महागाई वाढल्याने गेले काही महिने सोन्याची खरेदी मंदावली होती, पण आता खरेदीचा मोसम सुरू झाला असून, मागील दोन आठवड्यांचा तुलनेत सोन्या-चांदीच्या खरेदीत ३0 ते ४0 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय सोन्याचा मुलामा दिलेल्या कमी वजनाच्या गोल्ड फॉर्मिंंग दागिन्यांमध्ये मोदक कंठी, विडा-सुपारी, जास्वंदाची फुले, दुर्वा हार, उंदीर, विड्यांच्या पानावर मांडलेले पाच मोदक, मुकुट, कर्णफुले, कंबरपट्टा, राणीहार, सोंडेची सजावट, मोत्यांचा हार, मंगळसूत्र, वाळे, बाजूबंद आदी आदी दागिने बाजारात आहेत.

** सजावटीच्या वस्तू २५ टक्क्यांनी महाग
बाप्पांचे आगमन अवघ्या ५ दिवसांवर आल्याने जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पांचा बडेजाव करण्यासाठी सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली असून, वैविध्यपूर्ण वस्तू विक्रीस आहेत. यंदा २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मलमलीच्या कापडावर मांडलेल्या विशेष आसनावर गणपती बाप्पा विराजमान झाले, की भोवतीने सजलेल्या आरासाने गणरायाचे आणि गौरीचे रूप आणखी खुलून दिसते. काही जणांच्या घरातील सजावट अगदी डोळे दिपवून टाकणारी असते. ग्राहकांची ही आवड ओळखून व्यावसायिकांनी अगदी ५0 रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंंतच्या सजावटीच्या वस्तू विक्रीस आणल्या आहेत. गणेशोत्सवात घरगुती सजावटीसाठी लागणारी रुपेरी वर्क असलेली कागदाचे झुंबर, रंगीबेरंगी कागदाच्या झिरमिळ्या, हार तसेच थर्माकोलच्या विविध प्रकारच्या कलाकृतीही बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

** गणेशोत्सवाची लगबग सुरू
मूर्तिकार काठोळे यांनी सांगितले की, भव्यपणाबरोबरच रेखीव सजावटीवरही लक्ष केंद्रित केले जात असल्याने यंदाच्या उत्सवातही बाप्पांचे विलोभनीय आविष्कार पाहण्यास मिळतील. मोठी मूर्ती बनवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. मोठी मूर्ती चटकन लक्ष वेधून घेणारी असते, त्यामुळे रंग देताना खूप काळजी घ्यावी लागते. डोळे, अलंकारांकडेही विशेष लक्ष द्यावे लागते. मंडळांच्या मोठय़ा मूर्तींंवर सध्या शेवटचा हात देण्याचे काम चालू आहे. पावसाने चांगली साथ दिल्याने मूर्ती वेळेत वाळत आहेत. मूर्तीसाठी वापरण्यात आलेले रंग पोस्टर कलर आणि प्लास्टिक इमल्शन असल्याने ते उठून दिसतात. गणेश मंडळातील मंडपात प्रकाश योजना कशी केली जाईल, हे माहीत नसते. सगळा विचार करूनच आणि मूर्तीच्या उंचीनुसार रंग द्यावा लागतो. महागाई वाढल्याने गणेश मूर्तीच्या २0 टक्के किमती वाढल्या आहेत.

Web Title: Figures are up to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.