बुलढाणा : वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्यकारक मानली जाणारी घटना दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात समोर आली आहे. ३२ वर्षीय गर्भवती महिलेच्या गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे निदान झाले आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. ५ लाख प्रकरणांमध्ये अशी एकच घटना आढळून येते. त्यामुळे तपासणीनंतर या महिलेला अधिक तज्ज्ञांच्या देखरेखीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील एका गर्भवती महिलेने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. तिची सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना मोठा धक्का बसला. सोनोग्राफी करणारे डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी निरीक्षणादरम्यान वारंवार तपासणी केली. त्यांनी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने आणि स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांना माहिती दिली.सोनोग्राफीमध्ये गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे स्पष्ट दिसत होते. ३५ आठवड्यांहून अधिक वयाच्या या गर्भामध्ये काही हाडे आणि गर्भासारखी रचना दिसून आली. महिलेचे नऊ महिने पूर्ण झाल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहे, जिथे तिची प्रसूती तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होईल.
१९८३ मध्ये समोर आली पहिली घटना१९८३ मध्ये या प्रकारची पहिली घटना जगभरात समोर आली होती. आतापर्यंत अशी सुमारे २०० प्रकरणे नोंदविली गेली आहेत. भारतात मात्र अशा १५ घटना घडल्या आहेत.
डॉक्टरांचे मत:वैद्यकीय क्षेत्रातील ही दुर्मिळ घटना आहे. याला ‘फीटस इन फीटू’ म्हणतात. भारतात ही अशा प्रकारची १५ वी केस असल्याचे मानले जाते.-डॉ. भागवत भुसारी, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलढाणा