मोताळ्याचा पारा ४३ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 16:04 IST2017-04-20T16:04:32+5:302017-04-20T16:04:32+5:30
एप्रिल हिटचा तडाखा; उन्हाच्या उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही

मोताळ्याचा पारा ४३ अंशावर
मोताळा : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने तालुकावासियांची तगमग होत आहे. सकाळपासूनच जाणवणाऱ्या उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही होणार उकाडा त्यात भर घालत असल्याने मे महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अनेकांकडून वर्तविली जात आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या उन्हाचा तडाखा तालुकाभरात तीव्र असून १९ एप्रिल रोजी मोताळा शहराच्या तापमानाने ४३ अंश सेल्सिअस टप्पा गाठला आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, मागील पंधरवाड्यापासून तापमानाचा आलेख उंचावत आहे. दिवसा ३९ ते ४४ अंश सेल्सिअश तर संध्याकाळी २२ ते २५ अंश सेल्सिअशपर्यंत तापमान राहत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वाढत्या उन्हाच्या झळांनी सर्व नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तापमानाची सकाळ-संध्याकाळ कायम राहत असल्यामुळे आग ओकणाऱ्या सूर्याची तीव्रता सहन करावी लागत आहे.
उन्हाच्या तडाख्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून वाढत्या उष्णतेचा आरोग्यवरही परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाबरोबरच कमी दाबाचा परिणाम निघाल्यावर असह्य उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. तापमान वाढल्यामुळे शहरातील व्यापार मंदावला आहे. वाढत्या उन्हामुळे वन्यजीवांची होरपळ होत असल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखीआदी विषाणुजन्य आजारचे रूग्ण आढळून येत आहेत. खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या उष्ण झळा डोळ्यांसाठी धोकादायक धोक््याच्या ठरत आहेत.
वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य होत आहेत. जिकडे-तिकडे शुकशुकाट दिसून येत असून, दुपारचे उन टाळून अनेक जण सायंकाळी खरेदी करणे पसंत करीत आहे. वाढत्या तापमानामुळे थंडपेयाची विक्री वाढली असून, घरोघरी कुलर, पंख्याचा वापर वाढला आहे. कोल्डड्रिंक, रसवंती,आईस्क्रिम, ज्यूस सेंटरवर गर्दी वाढल्याचे दिसून येत आहेत. उन्हाच्या तडाख्याने उष्माघात, साथ रोगाची शक्यता अधिक असते. असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठी तब्येत सांभाळा, चिमुकल्याना उन्हात घेऊन जाऊ नका, उन्हात निघणे टाळा, जाणे गरजेचे असल्यास खाऊन व भरपूर पाणी पिऊनच निघावे, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे, डोळयावर चांगल्या प्रतीचा गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा किंवा रूमाल वापरावा, प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी. तीव्र उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होऊन संचार बंदी लागल्यासारखे दिसून येत आहेत. उन्हात फिरणाऱ्यांना उष्माघात होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हापासून स्वत:चा बचाव करण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.