तारेचे कुंपण उठले प्राण्यांच्या जीवावर!
By Admin | Updated: August 2, 2016 01:32 IST2016-08-02T01:32:09+5:302016-08-02T01:32:09+5:30
वन्यजीव धोक्यात; दोन बिबटांच्या मृत्यूने उडाली खळबळ.

तारेचे कुंपण उठले प्राण्यांच्या जीवावर!
ब्रह्मनंद जाधव / बुलडाणा
वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेताला असलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडत आहेत; परंतु शेतातील तारेच्या कुंपणात सोडलेला विद्युत प्रवाह वन्य प्राण्यांच्या जीवावर उठल्याचे वास्तव शेकापूर वनपरिक्षेत्रातील जामठी बिटमध्ये तेलीखोरे जंगलात दोन बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर उघडकीस आला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील १ हजार १६३ वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे.
नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन महत्त्वाचे आहे. वने नैसर्गिक स्रोतांचा अविभाज्य भाग असून, त्यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वन विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून वन्य जीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे.
यावर्षी चांगल्या पावसामुळे पिकंही चांगली बहरली आहेत; परंतु या पिकांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी तारेचे कुंपण करीत असून, त्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडत आहेत; परंतु शेतातील तारेच्या कुंपणात सोडलेला विद्युत प्रवाह वन्य प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. हा प्रकार बुलडाणा तालुक्यातील धाडपासून ३ किमी अंतरावर शेकापूर वन परिक्षेत्रातील जामठी बिटमध्ये तेलीखोरे जंगलात ३१ जुलै रोजी पहाटे ५ वाजता मादी असलेले दोन बिबट्याचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने समोर आला आहे. दोन्ही बिबट्यांचा मृत्यू शेतातील कुंपणाचा विद्युत शॉक लागल्याने झाला असून त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून त्यांना नाल्यात जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे वन विभागाने सांगितले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात इतर शेतकर्यांनाही शिकवण मिळाली आहे.
बिबट मृत्यू प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी
बुलडाणा तालुक्यातील धाड वन परिक्षेत्राच्या तेलीखोरे जंगलात नर-मादी जोडप्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाला मिळताच, पथकाने मध्यरात्री जामठी बीटमध्ये पाहणी केली. यात वनपरिक्षेत्रात असलेल्या गट नं.१९ मधील शेतात संरक्षणासाठी लावलेल्या कुंपनाच्या तारेत विद्युत प्रवाह सोडण्यात आल्याचे दिसले. वनक्षेत्रात फिरताना या कुंपणाच्या विद्युत तारेचा धक्का या बिबट्यांना लागताच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून त्यांना नाल्यात जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संशयीत म्हणून जामठी येथील साहेबराव शंकर थोरात (५६) व रमेश रामा रावळकर (४३) या दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांना बुलडाणा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.