महिलांची बुलडाणा शहर पोलिस स्टेशनवर धडक
By Admin | Updated: August 24, 2014 01:01 IST2014-08-24T01:01:12+5:302014-08-24T01:01:12+5:30
येळगाव दारूपासून मुक्त करावे, या मागणीसाठी येथील महिलांनी आज २३ ऑगस्ट रोजी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला धडक दिली.

महिलांची बुलडाणा शहर पोलिस स्टेशनवर धडक
बुलडाणा : शहरापासून चार किलो मीटर अंतरावर असलेल्या येळगाव दारूपासून मुक्त करावे, या मागणीसाठी येथील महिलांनी आज २३ ऑगस्ट रोजी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला धडक दिली. गावात मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या दारू विक्री होत असल्यामुळे अनेक ग्रामस्थ व्यसनाधीन झाल्याची व्यथा महिलांनी उपस्थित उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांच्यासमोर मांडली. बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथे मोठय़ा प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्यामुळे गावातील अनेक नागरिक व्यसनाधीन झाले आहेत. याशिवाय गावातील तरूण व विद्यार्थीही दारूच्या आहारी गेले आहेत. गावातील शाळेलगतच दारूचे दुकान आहे. त्यामुळे दारू पिवून अत्याचार करणार्या पतीचा त्रास वाढला आहे. गावातील अनेक महिला कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी मोलमजुरी करीत आहेत; परंतु संध्याकाळी त्यांच्याकडून पती जबरदत्तीने मजुरीचे पैसे घेऊन दारू पित आहेत. याबाबत महिला ग्रामसभेत गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी ठराव पारित करण्यात आला आहे. गावात महिलांवर होणार्या वाढत्या अत्याचार्याच्या विरूद्ध ग्रामस्थ महिलांनी आज दुपारी १२ वाजता बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला धडक देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांच्यासमोर व्यथा मांडली व निवेदन सादर केले. यावेळी शेख यांनी येळगाव येथील दारूबंदीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामभाऊ साळोख, पोलिस पाटील सिधूूूबा पाटील, ग्रा.पं.सदस्य प्रमिला राजपूत, किरण खिल्लारे, मिलिंद जाधव, मीरा कृपाल आदी बचत गटाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.