विद्यार्थ्यांचा अन्नत्यागाचा इशारा
By Admin | Updated: September 22, 2014 00:37 IST2014-09-22T00:37:26+5:302014-09-22T00:37:26+5:30
शेगाव वसतीगृहात निकृष्ट भोजन; विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा प्रवित्रा.

विद्यार्थ्यांचा अन्नत्यागाचा इशारा
शेगाव (बुलडाणा): येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन देण्यात येत असल्याची तक्रार समाज कल्याण विभाग बुलडाणा यांचेकडे करण्यात आली आहे. तसेच गृहपाल जे. वि. मोटे सतत गैरहजर राहत असून उध्दट वागणूक देतात, अशी तक्रार केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी मनसेच्या पदाधिकार्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करुन होणार्या जाचाबाबत सांगितले असता मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष माधव लिप्ते, शहराध्यक्ष अमित देशमुख, माजी तालुकाध्यक्ष विनोद टिकार, नारायण शेगोकार यांनी तात्काळ वस्तीगृह गाठून गृहपाल जे. वि. मोटे यांना जाब विचारत विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला. वस्तीगृहात ७५ मुलांची पटसंख्या असून ५0 विद्यार्थी नियमित वस्तीगृहाचा लाभ घेत आहेत. मुलांना स्वच्छ पाणी नसून निकृष्ट जेवण दिल्या जाते. परिसरामध्ये अत्यंत घाणीचे साम्राज्य असून हॉलमध्ये गाद्या फाटलेल्या आहेत. हॉलमध्ये सिलींगफॅन एकच असल्याने मुलांचा झोपेसाठी अकांततांडव करावा लागत आहे. वस्तीगृहामध्ये शेगाव शहरातील महात्मा फुले, बुरुंगले विद्यालय, ग.भि. मुरारका विद्यालय वर्ग ८ ते बीए पर्यंतचे विद्यार्थी असून त्यांच्या विविध समस्या निकाली काढाव्या अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी बोलतांना दिला आहे.